महाराष्ट्र

साखर उत्पादक शेतकरी सुखावले, यंदा २६.१५ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन; राज्यात १८२ साखर कारखाने कार्यरत

राज्यातील साखर हंगाम २०२५–२६ जोमात सुरू असून १० डिसेंबरपर्यंत १८२ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच ऊस गाळपात आणि साखर उत्पादनात जवळपास ८० टक्क्यांची वाढ झाली असून साखर उत्पादक शेतकरी सुखावला आहे.

गिरीश चित्रे

राज्यात नोव्हेंबरपासून साखर हंगामाला सुरुवात होते आणि यंदा नोव्हेंबर २०२५ मध्ये साखर हंगामाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे ऊस पुरवठ्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने दिलेल्या आकडेवारीनुसार, १० डिसेंबर २०२५ पर्यंत १८२ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला असून आतापर्यंत ३१६.३० लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्यात आला आहे. त्यातून २६.१५ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झाले. या उत्पादनाच्या सरासरी उताऱ्यात ८.२७ टक्के नोंद झाली आहे. मागील वर्षी याच काळात फक्त १५६ कारखान्यांनी १७०.०७ लाख टन ऊस गाळप केला होता. त्यातून १४.६१ लाख टन साखर उत्पादन झाले होते. त्यामुळे यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच ऊस गाळपात आणि साखर उत्पादनात जवळपास ८० टक्क्यांची वाढ झाली असून साखर उत्पादक शेतकरी सुखावला आहे.

जून महिन्यापासून सुरू होणाऱ्या पावसाला यंदाच्या वर्षी मे महिन्यापासून सुरुवात झाली. सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे नवीन गाळप हंगाम सुरु होण्यास विलंब झाला असताना कर्नाटक आणि महाराष्ट्रात ऊसदराच्या आंदोलनाची त्यात भर पडली आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात ऊस गाळप आणि नवीन साखर उत्पादनाची गती मंदावली आहे. मागील वर्षी निवडणुकामुळे नोव्हेंबरमध्ये ऊस गाळप करण्यास सुरुवात झाली होती. मात्र यंदा सरकारी ९१ आणि खासगी ९१ असे १८२ साखर कारखाने सुरू झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यात ४१, तर कोल्हापूरमध्ये ३५ कारखाने कार्यान्वित आहेत. परंतु सर्वाधिक ऊस गाळप कोल्हापूर विभागात झाले आहे. येथे ७३.१० लाख मेट्रिक टन ऊस गाळप करून ७.१६ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. या विभागाचा सरासरी उतारा ९.८० टक्के इतका असून तो राज्यात सर्वाधिक आहे, तर पुणे विभागात ७४.८५ लाख टन ऊस गाळप होऊन ६.४२ लाख टन साखर उत्पादन झाले आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत उत्पादनात ८० टक्क्यांची वाढ

यंदाचा हंगाम जोमात

हवामानातील चढ-उतार आणि काही भागांतील पावसाच्या अनिश्चिततेमुळे मराठवाड्यातील ऊस गाळप थोडा कमी झाला आहे. अमरावती आणि नागपूर विभागांमध्ये गाळप फारच मर्यादित असून उत्पादनात फारसा बदल झालेला नाही. मात्र, सध्या सुरुवातीपासूनच हंगाम जोमात सुरू असून ऊसाचे उत्पादन समाधानकारक आहे. पुढील काही आठवडे हवामान अशाच प्रकारे अनुकूल राहिल्यास गाळप आणि उतारा दोन्हीमध्ये वाढ होऊन याचा थेट परिणाम कारखान्यांच्या एकूण साखर उत्पादनावर होईल, असे राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे म्हणणे आहे.

Mumbai : कालिदास स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील सक्तीच्या कारवाईला स्थगिती; हायकोर्टाने BMC ला फटकारले

Mumbai : सेवानिवृत्त अधिकारीच मागच्या दाराने सल्लागार म्हणून येतात; स्थायी समितीत गणेश खणकर यांचा आरोप

Mumbai : सीएसएमटी येथील फलाट विस्तारासाठी दहा दिवसांचा ब्लॉक; अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्या दादर व ठाणे येथेच थांबणार

साताऱ्यातून अमेरिकन नागरिकांची फसवणूक; मुंबईतील २१ जणांच्या टोळीला अटक

चार संरक्षण कॉरिडॉर उभारण्यास मान्यता; मुख्यमंत्र्यांची माहिती