पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवारी (दि. २३) राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात 'टीईटी' घेण्यात येणार आहे. या परीक्षेला तब्बल ४ लाख ७५ हजार ६६९ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. परीक्षेत कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने केंद्रांवर नियंत्रण ठेवले जाणार असून, राज्यातील १ हजार ४२२ केंद्रांवर परीक्षा होणार असल्याची माहिती परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली.
इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी या वर्गातील शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने उमेदवारांनी परीक्षेस प्रतिसाद दिला आहे. पहिली ते पाचवीसाठी पेपर भाग १, तर सहावी ते आठवीसाठी पेपर भाग २ असणार आहे.
सिंधुदुर्गातून सर्वात कमी उमेदवार
पेपर भाग १ साठी २ लाख ३ हजार ३३३ उमेदवारांनी नोंदणी केली असून, पेपर भाग २ साठी २ लाख ७२ हजार ३३५ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. पेपर भाग १ आणि २ दोन्ही परीक्षांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची संख्या २ लाख २८ हजार २०० इतकी आहे. पेपर भाग १ ची परीक्षा ५६९ केंद्रांवर, तर पेपर भाग २ ची परीक्षा ८५१ केंद्रांवर होणार आहे. नोंदणी केलेल्या उमेदवारांमध्ये पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक ३७हजार २९३ अर्ज, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सर्वात कमी २ हजार ४२३ अर्ज प्राप्त झाले आहेत.
परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून देखरेख ठेवण्यात येणार आहे. तसेच टीईटी घोटाळ्याशी संबंधित उमेदवारांना यंदाच्या परीक्षेला प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे अशा उमेदवारांना अर्ज नोंदणी करता आली नाही. गतवेळी झालेल्या परीक्षेत टीईटी घोटाळ्यातील बहुतांश उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्या सर्व उमेदवारांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.डॉ. नंदकुमार बेडसे, अध्यक्ष परीक्षा परिषद
परीक्षेत सुरक्षा व्यवस्था अधिक कडक
परीक्षा केंद्रात प्रवेश करताना सर्व परीक्षार्थीची मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने तपासणी (फ्रिस्किंग) करण्यात येणार आहे. कोणताही विद्यार्थी मोबाईल, स्मार्टवॉच, कॅल्क्युलेटर व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेऊन जाणार नाहीत, याची विशेष काळजी घेतली जाणार आहे. टीईटी परीक्षेत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी यंदा राज्य परीक्षा परिषदेने काटेकोर उपाययोजना राबविल्या आहेत, असेही त्यांनी म्हटले.