राज्यात ९ कोटींहून अधिक मतदारांची घरोघरी जाऊन पडताळणी होणार; ३० जूनपासून अंमलबजावणीला प्रारंभ (संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

राज्यात ९ कोटींहून अधिक मतदारांची घरोघरी जाऊन पडताळणी होणार; ३० जूनपासून अंमलबजावणीला प्रारंभ

महाराष्ट्रात मतदार याद्या अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी येत्या ३० जूनपासून व्यापक मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्रात मतदार याद्या अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी येत्या ३० जूनपासून व्यापक मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत राज्यातील सुमारे ९ कोटी ८६ लाख मतदारांची घरोघरी जाऊन पडताळणी केली जाईल. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करणे आणि त्या पारदर्शक ठेवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेसाठी राज्यभरात १ लाख २ हजार ५३ केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रक्रिया पूर्णपणे निःपक्षपाती व्हावी म्हणून राजकीय पक्षांनाही सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले असून, विविध पक्षांनी आतापर्यंत १ लाख १३ हजार ५५८ प्रतिनिधी नियुक्त केले आहेत.

या प्रक्रियेत मतदारांना जुन्या नोंदींसह पूर्व-लिखित अर्ज दिले जातील. घर बंद असल्यास अधिकारी तीन वेळा भेट देतील. मतदारांना हे अर्ज ऑनलाईन भरण्याची सुविधाही असेल. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, मतदार ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड स्वीकारले जाणार असले, तरी आधार कायदा २०१६ च्या कलम ९ नुसार तो नागरिकत्वाचा पुरावा मानला जाणार नाही. कलम ३२६ नुसार मतदार भारतीय नागरिक आणि किमान १८ वर्षांचा असणे बंधनकारक आहे. प्रस्तावित नावे वगळण्याची मसुदा यादी राजकीय पक्षांसोबत पारदर्शकपणे सामायिक केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

७ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी

दोन दशकांत झालेले नागरीकरण आणि मतदारांचे मोठ्या प्रमाणावर झालेले स्थलांतर यामुळे मतदार याद्यांमध्ये दुबार नावांची शक्यता वाढली आहे. ही मोहीम पुढील महिन्यात सुरू होऊन ऑक्टोबरमधील सणासुदीच्या काळापूर्वी पूर्ण होईल. या वेळापत्रकानुसार ५ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत हरकती व दावे स्वीकारले जातील आणि ३ ऑक्टोबरपर्यंत त्यांचे निवारण केले जाईल. अखेर ७ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Mumbai : थुंकाल, घाण कराल तर खबरदार; २५० ते २५ हजारांपर्यंत दंडात्मक कारवाई, साडेतीनशेहून अधिक ज्युनिअर सुपरवायझरचा वॉच

मराठा आरक्षणाचा तिढा; आमदार प्रसाद लाड अंतरवाली सराटीत, मनोज जरांगेंची भेट घेत संवादाचे आवाहन

नोकऱ्या गेल्यामुळे अमेरिकेत थारा नाही; हजारो भारतीयांवर हद्दपारीचे संकट

Mumbai : ‘सलाम मुंबई’ घोषणेवर भाजपचा आक्षेप; IPL मध्ये ‘नमस्कार मुंबई’ शब्दाचा उल्लेख करावा

Mumbai : कोस्टल रोडच्या भुयारी मार्गावर छत; स्थायी समितीची अखेर मंजुरी