

मुंबई : वन्यजीव संवर्धनासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचाही वापर होणार आहे. पक्ष्यांच्या हालचाली, स्थलांतर, घरटी बांधण्याची प्रक्रिया आणि त्यांच्या अधिवासावर सतत लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्रात देशातील पहिलं AI-आधारित पक्षी अभयारण्य उभारलं जाणार आहे. ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यात हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला जाणार असून, यामुळे पक्षी संवर्धनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे.
ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यात उभारला जाणार प्रकल्प
राज्य सरकारने ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यात (Thane Creek Flamingo Sanctuary) ४५ कोटी रुपयांच्या इको-नेचर पार्कला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाचा उद्देश केवळ पर्यटकांना आकर्षित करणे नसून, पक्ष्यांच्या अधिवासाचे संरक्षण करणे आणि त्यांच्या हालचालींवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने लक्ष ठेवणे हा आहे.
AI तंत्रज्ञान नेमकं कसं करणार काम?
या अभयारण्यात AI-सक्षम कॅमेरे, ध्वनी टिपणारे सेन्सर्स (Acoustic Sensors) आणि डेटा विश्लेषण प्रणाली (Data Analytics) बसवण्यात येणार आहेत. या तंत्रज्ञानामुळे पक्ष्यांचे फोटो, आवाज आणि हालचालींचे विश्लेषण करून विविध प्रजातींची ओळख आपोआप करता येणार आहे. विशेष म्हणजे, हे सर्व निरीक्षण पक्ष्यांना कोणताही त्रास न देता केले जाणार आहे.
पक्ष्यांच्या स्थलांतरापासून घरट्यांपर्यंत सर्व माहिती मिळणार
AI प्रणालीच्या मदतीने पक्ष्यांचे स्थलांतर, घरटी बांधण्याच्या सवयी, प्रजनन आणि वर्तनातील बदल यांची माहिती रिअल-टाइममध्ये मिळणार आहे. एखाद्या भागात पर्यावरणात अचानक बदल झाला, अधिवास धोक्यात आला किंवा बेकायदेशीर हालचाली आढळल्या, तर संबंधित यंत्रणेला तातडीने सूचना मिळू शकतील. त्यामुळे वेळेवर उपाययोजना करणे शक्य होणार आहे.
संशोधन आणि संवर्धनासाठीही ठरणार उपयुक्त
या प्रकल्पातून मिळणाऱ्या माहितीचा उपयोग वन विभाग, पर्यावरण तज्ज्ञ आणि संशोधकांना होणार आहे. पक्ष्यांच्या अधिवासाचे संवर्धन, परिसंस्थेचे व्यवस्थापन आणि हवामान बदलाचा पक्ष्यांवर होणारा परिणाम यांचा अभ्यास करण्यासाठी हा डेटा महत्त्वाचा ठरेल.
ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याचे महत्त्व
मुंबई आणि नवी मुंबईच्या दरम्यान असलेले ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य हे दरवर्षी हजारो गुलाबी फ्लेमिंगोसह २०० हून अधिक पक्षी प्रजातींचे आश्रयस्थान आहे. भारतात सुमारे १,३०० हून अधिक पक्षी प्रजाती आढळतात. मात्र शहरीकरण, जंगलतोड, प्रदूषण आणि हवामान बदलामुळे अनेक प्रजाती धोक्यात आहेत. अशा परिस्थितीत AI आधारित हे अभयारण्य पक्षी संवर्धनासाठी महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.