मुंबई : राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून मुंबई, पुणे, विदर्भ, मराठवाडा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. मे महिन्यात कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील व्यवस्था कोलमडली असून शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गुरुवारी सकाळपासून मुंबई, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरूच होती. दरम्यान, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.
महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरीत शुक्रवारी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आले असून मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात शुक्रवार व शनिवारी ‘ऑरेंज अलर्ट’ तर संपूर्ण कोकण किनारपट्टी भागातही उद्या शुक्रवारी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आले असून कोकणासह महाराष्ट्रातील काही भागात मेघगर्जनेसह अतिवृष्टी होईल, असा इशारा कुलाबा हवामान विभागाने दिला आहे.
गेल्या काही वर्षांत वातावरणीय बदलामुळे पाऊसही लहरी झाला आहे. त्यामुळे मे महिन्यात जुलै महिन्यासारखा पाऊस बरसत आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबई, पुण्यासह विदर्भ, मराठवाड्यात अनेक भागांत बुधवारी रात्री पाऊस झाला आणि गुरुवारी सकाळीही पावसाळी वातावरण होते. राज्यात पावसाचा जोर २४ मेपर्यंत कायम असणार आहे, असा अंदाज कुलाबा हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. पुढील दोन दिवस दक्षिण कोकण आणि दक्षिण-मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरीत ‘रेड अलर्ट’ जारी केले असून कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज कुलाबा हवामान विभागाने वर्तवला आहे.
यंदा मे महिन्यात उन्हाचे चटके सहन करण्याऐवजी नागरिक पावसाळ्याचा अनुभव घेत आहेत. मागील काही दिवसांपासून प्री-मान्सून पावसाला सुरुवात झाली आहे. सध्या हा पाऊस वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह होत आहे. वाऱ्याचा वेग ताशी ५० ते ६० किलो मीटरपर्यंत असण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
ताशी ३५ ते ६० किमी वाऱ्याचा वेग
दक्षिण कोकण किनारपट्टी, गोवा, पूर्व-मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून पुढील ३६ तासांत तो अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तरेकडे वारे वाहू लागल्याने संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. तर वाऱ्याचा वेग ३५ ते ४० किंवा ६० किलोमीटर ताशी असेल. त्यामुळे काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून गुजरात किनारपट्टी व कोकण किनारपट्टीवर मच्छीमारांनी पुढील चार दिवस समुद्रात जाऊ नये, असे आवाहन कुलाबा हवामान विभागाच्या अधिकारी शुभांगी भुते यांनी केले आहे.
आज येथे ‘रेड अलर्ट’
रायगड, रत्नागिरी
दोन दिवस ‘ऑरेंज अलर्ट’
मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, अहिल्या नगर, पुणे घाट, सातारा घाट, छत्रपती संभाजी नगर,