महाराष्ट्र

राज्य निवडणूक आयोगाची मोठी घोषणा! जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तारखेत बदल; 'या' दिवशी होणार मतदान

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला असून राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखांमध्ये राज्य निवडणूक आयोगाने बदल केला आहे.

किशोरी घायवट-उबाळे

राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखांमध्ये राज्य निवडणूक आयोगाने बदल केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला असून याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, याआधी ५ फेब्रुवारीला होणारे मतदान आता ७ फेब्रुवारीला होणार आहे. तर, मतमोजणीची तारीख ७ ऐवजी ९ फेब्रुवारी करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी १३ जानेवारी २०२६ रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे, नामनिर्देशनपत्र मागे घेणे, चिन्ह वाटप आणि निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे या प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. त्यापुढील मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे शिल्लक आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी ३१ जानेवारी २०२६ च्या पुढे फक्त दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली आहे. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (दि.२८) अकाली निधन झाल्याने राज्य शासनाने राज्यात २८ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६ पर्यंत दुखवटा जाहीर केला आहे. या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

राज्य निवडणूक आयोगानुसार, संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना ३१ जानेवारीला प्रसिद्ध करतील. आता ७ फेब्रुवारीला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. त्यामुळे जाहीर प्रचार ५ फेब्रुवारीला रात्री १० वाजता संपेल. संबंधित ठिकाणी ९ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता मतमोजणी सुरु होईल. मतमोजणी पूर्ण होऊन निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणी लागू असलेली आचारसंहिता संपुष्टात येईल, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

निवडणूक वेळापत्रक :

  • सुधारित निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना प्रसिद्ध : ३१ जानेवारी

  • मतदान : ७ फेब्रुवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०

  • जाहीर प्रचाराची समाप्ती : ५ फेब्रुवारी रात्री १० वाजता

  • मतमोजणी : ९ फेब्रुवारी सकाळी १० वाजता

  • निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध : ११ फेब्रुवारी

अजित दादा पंचतत्त्वात विलीन! शोकाकूल वातावरणात पार्थ आणि जय पवारांनी दिला मुखाग्नी; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

"दादांना म्हणालो होतो रात्रीच कारने जाऊ, पण..."; अजित पवारांच्या चालकाला 'त्या' रात्रीची आठवण सांगताना अश्रू अनावर

Ajit Pawar death : अपघाताची बातमी दादांच्या आईने पाहिली तेव्हा..."मला दादांना भेटायचे आहे!"

'दादा'ला I Love You सांग...; अजित पवारांवर अंत्यसंस्कारापूर्वी बारामती मेडिकल कॉलेजबाहेर कार्यकर्त्याने फोडला हंबरडा, भावूक Video

एका चुकीबद्दल अन्नपाण्याविना केला होता आत्मक्लेश; यशवंतरावांचे स्मृतिस्थळ होते अजितदादांचे शक्तिस्थळ!