मुंबई : सौरऊर्जेच्या माध्यमातून भविष्यात १५ ते १६ हजार मेगावॅट वीज तयार करण्यावर महावितरणने जोर दिला आहे. त्यामुळे ग्राहकांना स्वस्त दरात वीज देण्याचे नियोजन महावितरण प्रशासनाने केले आहे. त्यामुळे आगामी पाच वर्षांत वीज दर निश्चित करण्याचा प्रस्ताव महावितरणने वीज नियामक आयोगाकडे पाठवला आहे. या प्रस्तावानुसार आगामी पाच वर्षांत घरगुती विजेचे दर २३ टक्क्यांनी कमी होणार असल्याने याचा फायदा राज्यातील सुमारे तीन कोटी ग्राहकांना होईल.
महावितरण कोळशापासून तयार होणारी वीज खरेदी करते. या विजेचा दर सहा ते सात रुपये प्रतियुनिट आहे. यासोबतच कोळशाचे दर वाढले तरी त्याचा परिणाम वीज दरावर होतो. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून महावितरणने सौरऊर्जेवर भर दिला आहे. महावितरणला सौरऊर्जेच्या माध्यमातून दिवसा सरासरी दोन हजार मेगावॅट वीज उपलब्ध आहे. यामध्ये आणखी वाढ करण्याचे प्रयत्न महावितरण करत आहे. त्यानुसार १५ ते १६ हजार मेगावॅट वीज सौरऊर्जेतून मिळविण्याचा महावितरणचा प्रयत्न आहे. यामुळे भविष्यात विजेचे दर आणखी कमी होऊ शकतात.