मुंबई : प्रचंड बहुमताने सत्तेत असतानाही, महायुतीमधील नाराजी संपण्याची कोणतीच चिन्हे नाहीत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त मुंबईत चैत्यभूमीवर सोमवारी आयोजित कार्यक्रमादरम्यान नियोजित भाषण रद्द करण्यात आल्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघेही नाराज झाल्याची चर्चा आहे. ऐनवेळी कार्यक्रमपत्रिकेत बदल करण्यात आला, पण त्याची कल्पना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना न देण्यात आल्यामुळे शिंदे थेट आपल्या निवासस्थानी ठाण्याला निघून गेले, तर अजितदादांनीही काढता पाय घेतला. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर पुढच्याच दिवशी नाराजीनाट्य घडल्यामुळे महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याचे समोर येत आहे.
दादर येथील चैत्यभूमीवरील कार्यक्रमाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बरीचशी नेतेमंडळी उपस्थित होती. मुख्यमंत्र्यांच्याआधी शिंदे आणि अजित पवार यांचे भाषण होणार होते. पण दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे भाषण ऐनवेळी रद्द करण्यात आले. या कार्यक्रमात फक्त राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची भाषणे झाली. कार्यक्रमपत्रिकेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांना प्रत्येकी पाच मिनिटे भाषणासाठी देण्यात आली होती. पण दोन्ही नेत्यांना भाषणातून वगळण्यात आल्याने शिंदे यांनी अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला. पण भाषणासाठी तुमचं नाव नसल्याची कल्पना तुम्हाला दिली नव्हती का? असा उलट सवालच अधिकाऱ्यांनीच शिंदेंना विचारला. त्यानंतर कार्यक्रम पत्रिकेत कुणाच्या सांगण्यावरून बदल करण्यात आला आणि कोणत्या अधिकाऱ्याने बदल केला, याची चौकशी शिंदेंकडून केली जात आहे.
ठाणे येथील निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत नाराजीबद्दल शिंदे म्हणाले की, “चैत्यभूमीला जाणे, बाबासाहेबांचे दर्शन घेणे, बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करणे, यापेक्षा दुसरे काय मोठे असू शकते? त्यामुळे आज बाबासाहेबांची जयंती चैत्यभूमीला साजरी झाली. आम्ही सगळे गेलो. इथे साजरी झाली. वेगवेगळ्या ठिकाणी साजरी होत आहे. हजारो-लाखो ठिकाणी बाबासाहेबांची जयंती साजरी होते. याचा आनंद प्रत्येकाला आहे. तसा मलाही आहे. भीम जैसा सूरज अगर निकला न होता, तो हमारे जीवन में उजाला ना होता,” अशी सारवासारव त्यांनी केली.