महायुतीत ‘ब्लेम गेम’! शिवसेनेने महायुतीचा धर्म पाळला नाही - भाजप; भाजपने आधी पराभवाचे आत्मपरीक्षण करावे - शिंदेसेना 
महाराष्ट्र

महायुतीत ‘ब्लेम गेम’! शिवसेनेने महायुतीचा धर्म पाळला नाही - भाजप; भाजपने आधी पराभवाचे आत्मपरीक्षण करावे - शिंदेसेना

विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला चीतपट केल्यानंतर आता सत्ताधारी महायुतीमध्येच आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडू लागला आहे.

Swapnil S

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला चीतपट केल्यानंतर आता सत्ताधारी महायुतीमध्येच आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडू लागला आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत पुणे आणि नागपूरमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने महायुतीचा धर्म पाळला नाही, असा आरोप प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी केला. त्यानंतर भाजप नेत्यांनीही शिवसेनेवर टीकेचे आसूड ओढले. त्यातच शिवसेना शिंदे गटानेही भाजपवर पलटवार करत भाजपला विधानपरिषद निवडणुकीतील पराभवाचे आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. या आरोप-प्रत्यारोपांमुळे महायुतीत बेबनाव व राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

विधान परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या नागपूर आणि पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या अधिकृत उमेदवाराला शिवसेना शिंदे गटाने पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराशी विजयासाठी झुंजावे लागले. त्यामुळे भाजपने विधान परिषद निवडणुकीतील पराभवाचे खापर शिंदे गटावर फोडले आहे.

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पुणे आणि नागपूरमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने अपेक्षित सहकार्य केले नाही. पुण्यात ऐनवेळी सचिन सानप यांना पाठिंबा देऊन शिवसेनेने महायुतीच्या एकजुटीलाच धक्का दिला. त्यांना मिळालेली मते पदवीधर निवडणुकीत भाजपला मिळाली नाहीत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांनी तर थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात प्रचार केल्याने त्याचाही फटका बसल्याची टीका प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी केली.

शिवसेनेने महायुतीचा धर्म पाळून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सहकार्य केले असते, तर पाचही जागांवर महायुतीचा विजय झाला असता. मात्र, पुण्यातील एका जागेच्या हव्यासापोटी शिवसेनेने मित्रपक्षांना अडचणीत आणले आणि तीन जागांवरील विजयाची संधी गमावली. एका जागेसाठी मित्रपक्षांचे नुकसान करण्याची भूमिका महायुतीच्या हिताची नाही, असे नवनाथ बन यांनी शिंदे गटाला सुनावले.

शिंदे गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी भाजपचे आरोप फेटाळून लावले आहेत. पुणे पदवीधरमध्ये भाजपने दिलेला उमेदवार हा भाजपचा सदस्यही नव्हता. बाहेरचा उमेदवार दिल्यामुळे भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण होऊन त्यांनी आणि मतदारांनी या उमेदवाराला नाकारले. त्यामुळे या पराभवाचे खापर शिवसेनेवर फोडणे चुकीचे आहे, असे परांजपे म्हणाले. विधान परिषद निवडणुकीतील पराभवाबद्दल भाजपकडून शिवसेनेवर करण्यात येणारे आरोप बिनबुडाचे असून तिन्ही पक्षांनी या निकालाचे आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

शिवसेना नेहमीच युतीधर्म पाळते आणि युतीधर्माचे पालन झाले पाहिजे, ही शिवसेनेची भूमिका कायम आहे. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये चार ठिकाणी युती होती. एका ठिकाणी पुणे मतदारसंघांमध्ये शिवसेना पुरस्कृत आणि भाजपचा उमेदवार अशी मैत्रीपूर्ण लढत देखील होती. त्यामुळे शिवसेनेने नेहमी युतीधर्म पाळलेला आहे आणि युतीधर्म पाळावा, अशी भूमिका शिवसेनेची नेहमी राहिलेली आहे.
एकनाथ शिंदे, मुख्य नेते, शिवसेना शिंदे गट
एकनाथ शिंदेंना सल्ला देऊ नये. हे मी फडणवीसांना सल्ला देण्यासारखे आहे. धंगेकरांनी जे पत्र काढले आहे, त्याची दखल शिंदे घेतील. शिंदेंनी उठाव केला नसता तर परिस्थिती काय राहिली असती. त्यामुळे बन यांना या निवडणुकीचे माहिती नसेल आणि त्यांचा गैरसमज झाला असेल, तर तो आमचे प्रवक्ते दूर करतील.
उदय सामंत, शिवसेना नेते
निकालाचे विश्लेषण होईल, आत्मपरीक्षण होईल. महायुती म्हणून आम्ही एकसंघपणाने लढायला पाहिजे होते, ही सगळ्यांची भूमिका आहे. एकदिलाने लढलो असतो तर चित्र अजून वेगळे असते. विधानसभा निवडणुकीत आम्ही एकदिलाने लढलो तेव्हा महायुतीची ताकद दिसली. सर्व मित्रपक्षांना हे कळले पाहिजे, आपण एकदिलाने लढलो तेव्हा महाविकास आघाडी समोर उभीही राहू शकली नसती.
नितेश राणे, भाजप नेते
आमच्या मित्रपक्षाने मदत केली नाही, हे स्पष्ट आहे. कारण मित्रपक्षाचा पुण्याचा महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी निवडणुकीपूर्वी आवाहन केले होते आणि जिंकून आल्यानंतरही प्रतिक्रिया दिली. तो पक्षाचा महत्त्वाचा पदाधिकारी आहे. त्यामुळे वरून आदेश आल्याशिवाय हे होत नाही. शिंदेंनी या ठिकाणी लक्ष घातले पाहिजे. आपल्यातच अशा कुरघोडी, वार-पलटवार होणार असतील तर ते महायुतीच्या भविष्यासाठी चांगले राहणार नाही.
प्रवीण दरेकर, भाजप आमदार
कुठल्याही निवडणुकीत जय-पराजय असतो. प्रत्येक निवडणूक आपल्याला सकारात्मक विचार करायला भाग पाडते. आत्मपरीक्षण करावे लागते, या निकालाचे आम्ही आत्मपरीक्षण करू आणि नक्कीच सुधारणा करू. या निकालाने आम्हाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि ते आम्ही नक्कीच करू.
सुनेत्रा पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अ. प.
शिक्षक आणि पदवीधर हा समाजातील वेगळ्या पद्धतीचा घटक आहे. त्यांना मतदान कुठे करायचे हे समजते. त्यांनी राज्यातील नेतृत्वाच्या विरोधात मतदान केल्याचे चित्र महाराष्ट्रात दिसत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे पुन्हा महाराष्ट्राचे नेतृत्व दिले पाहिजे.
रवींद्र धंगेकर, माजी आमदार शिवसेना शिंदे गट

२०१९ नंतर उद्धवजींनी मला बोलावलेच नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Thane : अखेर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा; शिवसेना पक्षाची प्रतिष्ठा जपण्यासाठी पद सोडण्याचा निर्णय

‘एमसीए’ने 'एनसीएलटी'वर पूर्णपणे ताबा मिळवलाय; सर्वोच्च न्यायालयाची कठोर टिप्पणी

नाशिक : ध्वजारोहणासाठी गोदाकाठ सजला; राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी डीएमएक्स पिक्सेल थ्रीडी मॅपिंगसह आकर्षक रोषणाई

'नागपूरमधील पराभवाची जबाबदारी स्वीकारतो' - चंद्रशेखर बावनकुळे