मुंबई : नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये काहीसे बिनसले होते. मात्र, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुती एकत्र रिंगणात उतरणार असल्याची घोषणा महायुतीतील नेत्यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण या दोघांमध्ये गुरुवारी रात्री उशिरापर्यंत शिंदे यांच्या ‘देवगिरी’ या निवासस्थानी युतीसंदर्भात चर्चा झाली. यावेळी आगामी निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार असल्याचे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची सेना ७० ते ९० जागांवर आग्रही असल्याचे समजते. महायुती म्हणून निवडणूक लढवली पाहिजे, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली असली तरी पक्षस्तरावर महायुतीचा निर्णय घेण्यात येईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
आगामी निवडणुका लक्षात घेता, भाजप व शिवसेना यामधील वाद शमवण्याचे प्रयत्न महायुतीच्या नेत्यांकडून सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुरुवारी रात्री उशिरा भेट घेतली. जवळपास दोन तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. आगामी महापालिका निवडणूक महायुती म्हणूनच आम्ही सामोरे जाऊ, असे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले आहे. आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांसंदर्भात कशाप्रकारे पुढे जायचे, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व मी स्वत: अशी आमची संयुक्त बैठक पार पडली होती. तसेच भाजपच्या कोअर कमिटीचीही बैठक झाली. महानगरपालिका निवडणुका जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. परंतु जिल्हा परिषद निवडणुकांमधील आरक्षणाचा प्रश्न उच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे या निवडणुका कदाचित लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढताना आगामी रणनीती आखण्याच्या दृष्टीने काही पद्धती विकसित करण्याची गरज यावेळी व्यक्त केली होती. मुंबई व अन्य महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये महायुती व्हायला हवी, अशी अपेक्षा या बैठकीमध्ये सर्वांनी व्यक्त केली. त्यानुसार सर्व महानगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षस्तरावर समित्या तयार करून युतीचा फॉर्म्युला ठरविण्याच्या दृष्टीने बैठकीत चर्चा झाल्याची माहितीही रवींद्र चव्हाण यांनी दिली. समिती स्थापन करून
नियोजन करणार - रवींद्र चव्हाण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महापालिका निवडणुकांमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांची कमिटी तयार करून पुढील नियोजन करण्याच्या दृष्टीने चर्चा केली जाईल. आगामी निवडणुका या महायुती म्हणून सकारात्मकरित्या लढण्याचा विचार व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई व अन्य महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये महायुती म्हणून लढण्याचा निर्णय वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आल्याचे रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.
विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली - शिंदे
अडीच वर्षांचा माझा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ आणि देवेंद्र फडणवीस यांचा वर्षभराचा कार्यकाळ हा लोकांसमोर आहे. आम्ही कामाच्या जोरावर आणि विकासाच्या अजेंड्यावर या निवडणुका लढणार आहोत. महाराष्ट्रातील जनता सूज्ञ आहे. काम करणाऱ्या लोकांच्या मागे ही जनता उभी राहील. साडेतीन वर्षांमध्ये महायुतीने लोकांच्या आयुष्यात बदल घडवणारे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. महायुती सरकारने लोकाभिमुख योजना अंमलात आणल्या असून लोकांच्या पसंतीस उतरली असल्याने विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.