मुंबई : पैशांचे आमिष दाखवून फसवणुकीच्या प्रकरणात वाढ झाली असून अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आता पोलिसांच्या मदतीला अर्थतज्ज्ञ मालमत्तेचे मुल्यांकन करणारी यंत्रणा उभारण्यात येणार आहे. यामुळे मालमत्तेचे मूल्यांकन करत तीची विक्री करणे सोयीस्कर होईल. तसेच आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात ७ वर्षांपेक्षा अधिक शिक्षा व १ लाखांहून अधिक दंडाच्या रकमेत वाढ करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधान सभेत दिली. महाराष्ट्रातील हजारो ठेवीदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या मैत्रेय प्लॉट्स अॅण्ड स्ट्रक्चर्स प्रा. लि. आणि मैत्रेय सुपरस्ट्रक्चर्स प्रा. लि. या कंपन्यांविरोधात शासन निर्णायक आणि ठोस कारवाई करत आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी यावेळी दिली. विधान सभा सदस्य अमोल खताळ, सुधीर मुनगंटीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तर दिले.
मैत्रेय ग्रुप प्रकरणात २९ लाख ८७ हजार ४२२ गुंतवणूकदारांची सुमारे २५०० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. आत्तापर्यंत ३१ गुन्हे नोंदवले गेले असून ५६ आरोपींविरोधात कारवाई सुरू आहे. ४०९ प्रॉपर्टी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ३६० मालमत्तांच्या मूल्यांकनासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे.