दुचाकीवरून आलेल्या तिघांनी मालेगावमध्ये गुरुवारी (दि. ३१ जुलै) रात्री एका युवकाची निर्घृण हत्या केली. यामुळे शहरात खळबळ उडाली. वर्दळीच्या मोतीबाग नाका परिसरात मारेकऱ्यांनी धारदार शस्त्र आणि लाकडी दांडक्याने युवकावर हल्ला करून त्यास जखमी केले आणि नंतर डोक्यात दगड घालून यमसदनी धाडले. नितीन निकम (वय २५) असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या राष्ट्रीय हमरस्त्यावरील मोतीबाग नाका परिसरात नितीन हा रस्त्याच्या कडेला उभा होता. त्यावेळी दुचाकीवरून तिघे जण घटनास्थळी आले. त्यांनी नितीनवर हल्ला करून त्यास रक्तबंबाळ केले. त्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घातला. त्यामुळे नितीनचा जागीच मृत्यू झाला. यानंतर तिघे त्याच दुचाकीवरून पसार झाले.
हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत तपासाची चक्र फिरवली. त्यानुसार, सचिन अहिरे, परेश पगारे आणि केतन अहिरे (सर्व रा. मालेगाव) यांना ताब्यात घेतले. हल्ल्याचे कारण समजू शकले नसले तरी पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मध्यरात्री झालेल्या खुनाच्या घटनेने शहरात खळबळ माजली.