Photo - IANS 
महाराष्ट्र

मालेगावात जनआक्रोश! चिमुकलीच्या न्यायासाठी मालेगावकर एकवटले; न्यायालयासमोर ठिय्या आंदोलन

मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील तीन वर्षीय चिमुकलीवर झालेल्या क्रूर बलात्कार आणि निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण मालेगाव हादरले आहे. या अमानुष कृत्याच्या निषेधार्थ आज शहरात प्रचंड जनआक्रोश उसळला. ‘चिमुकलीचा बदला फाशीच’ या मागणीसाठी सर्व जाती-धर्मातील नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

नेहा जाधव - तांबे

मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील तीन वर्षीय चिमुकलीवर झालेल्या क्रूर बलात्कार आणि निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण मालेगाव हादरले आहे. या अमानुष कृत्याच्या निषेधार्थ आज शहरात प्रचंड जनआक्रोश उसळला. ‘चिमुकलीचा बदला फाशीच’ या मागणीसाठी सर्व जाती-धर्मातील नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

न्यायालयाच्या आवारात नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले. संताप तीव्र होताच काही आंदोलकांनी न्यायालयाचा गेट तोडून आत शिरण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याचे समजते.

मालेगाव बंदची हाक – शहर कडकडीत बंद

चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ मालेगाव बंदचे आवाहन करण्यात आले होते. व्यापारी संघटना, शाळा-महाविद्यालये, सामाजिक व राजकीय संघटनांनी या बंदला मोठा पाठिंबा दिला. शहरातील बहुतांश दुकानं, बाजारपेठा आणि मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत.

दादा भुसेंची संतप्त प्रतिक्रिया

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनीही मोर्चात उपस्थित राहून नागरिकांच्या भावना ऐकून घेतल्या. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले, “हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा मिळालीच पाहिजे. मालेगाव वकील संघाने आरोपीची बाजू न्यायालयात कोणीही मांडणार नाही असा निर्णय घेतला आहे, ही समाजाची शक्ती आहे.”

यावेळी त्यांनी डीवायएसपी बाविस्कर यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “आरोपीची पोलीस कोठडी संपलेली असताना डीवायएसपींनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली, हा प्रकार निषेधार्ह आहे. अशा अधिकाऱ्याला तातडीने निलंबित केले पाहिजे,” अशी मागणी भुसेंनी केली.

मालेगावकर जनता एकवटली

रामसेतू पुलावरून नागरिकांनी मोठ्या संख्येने मोर्चा काढला आणि अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या मोर्चात हिंदू-मुस्लीम समाजबांधवांनी खांद्याला खांदा लावून सहभाग घेतला. यावेळीही चिमुकलीचा बदला फाशी अशी मागणी करण्यात आली.

नेमकं काय घडलं?

१६ नोव्हेंबर रोजी डोंगराळे गावात ही अमानुष घटना घडली. घराच्या अंगणात खेळत असलेल्या तीन वर्षीय मुलीला गावातीलच विजय संजय खैरनार (वय २४) याने चॉकलेटचे आमिष दाखवून पळवून नेले. गावातील एका टॉवरजवळ त्याने चिमुकलीवर अत्याचार केला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी दगडाने ठेचून तिची हत्या केली.

मुलगी घरी परत न आल्याने कुटुंबियांनी व गावकऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली. धक्कादायक म्हणजे आरोपीही या शोधामध्ये सहभागी झाला होता, जे नंतर तपासात उघड झाले. दरम्यान, एका महिलेनं आरोपीला मुलीसह टॉवरकडे जाताना पाहिल्याचे सांगितल्याने पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले.

मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून कठोर शिक्षेसाठी स्थानिक नागरिक आणि कुटुंबीय आक्रमक झाले आहेत.

Google Drive चा ऑटो-बॅकअप बंद; फोटो-व्हिडीओ सुरक्षित ठेवण्यासाठी 'या' सेटिंग्स आताच बदला

Jharkhand Student Protest : भरती परीक्षांविरोधात आंदोलन; बॅरिकेड्स तोडून हजारो विद्यार्थ्यांचा विधानसभेवर मोर्चा, Video

युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला; १२ जणांचा मृत्यू, ३९ जखमी, Video

एल निनोमुळे किंमतवाढ; कुटुंबांना फटका बसण्याची 'एस अँड पी'ला भीती

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनासाठी दिल्ली मेट्रोचा खास अंदाज; 'हर घर तिरंगा' थीमवर साकारली विशेष ट्रेन