मनमाडमध्ये मनोरुग्णाचा हाय व्होल्टेज ड्रामा; ओव्हरहेड वायरच्या खांबावर चढल्याने रेल्वे सेवा विस्कळीत 
महाराष्ट्र

Nashik : मनमाडमध्ये मनोरुग्णाचा हाय व्होल्टेज ड्रामा; ओव्हरहेड वायरच्या खांबावर चढल्याने रेल्वे सेवा विस्कळीत

नाशिक जिल्ह्यातील मनमाड रेल्वे स्थानकावर एका मनोरुग्ण व्यक्तीने ओव्हरहेड वायरच्या खांबावर (गॅन्ट्री) चढून गोंधळ घातल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी दुपारी घडली. या व्यक्तीने उच्च दाबाच्या ओव्हरहेड वायरला लटकण्याचा प्रयत्न केल्याने रेल्वे प्रशासनाला तत्काळ वीजपुरवठा खंडित करावा लागला.

Swapnil S

मुंबई : नाशिक जिल्ह्यातील मनमाड रेल्वे स्थानकावर एका मनोरुग्ण व्यक्तीने ओव्हरहेड वायरच्या खांबावर (गॅन्ट्री) चढून गोंधळ घातल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी (दि. १७) दुपारी घडली. या व्यक्तीने उच्च दाबाच्या ओव्हरहेड वायरला लटकण्याचा प्रयत्न केल्याने रेल्वे प्रशासनाला तत्काळ वीजपुरवठा खंडित करावा लागला. या हाय व्होल्टेज ड्रामामुळे स्थानकावर मोठी खळबळ उडाली असून काही काळ रेल्वे सेवाही विस्कळीत झाली होती.

दुपारी ३ च्या सुमारास साधारण ३० वर्षे वयोगटातील एका व्यक्तीने अचानक फलाटाच्या छतावर आणि त्यानंतर गॅन्ट्रीवर चढून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला असून, त्यामध्ये हा अर्धवट कपड्यांमधील तरुण गॅन्ट्रीवरून धोकादायक पद्धतीने लटकताना दिसत आहे. त्याला खाली उतरवण्यासाठी रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांनी धावपळ केली. पाच ते सहा जण त्याला पकडण्यासाठी मागे धावत असताना फलाटावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून ओव्हरहेड वायरचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. या काळात काही गाड्या इतर फलाटांवरून वळवण्यात आल्या. सुमारे ४० मिनिटांच्या थरारानंतर या व्यक्तीला सुरक्षितपणे खाली उतरवण्यात यश आले. या प्रकारामुळे रेल्वे वाहतुकीवर थोडा वेळ परिणाम झाला असला तरी, आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

व्यसनमुक्त नवी मुंबईसाठी अत्याधुनिक सुविधा केंद्र; औषधोपचारांसोबत मानसोपचार, समुपदेशन, योग-ध्यानाची सुविधा

Mira-Bhayandar : मराठीला विरोध करत रिक्षाचालकांचे आंदोलन; २५ रिक्षांवर RTO ची कारवाई

VIP दर्शनावरून मंदिरात राडा; आमदाराच्या मुलीने महिला PSI च्या कानशिलात लगावली, प्रत्युत्तरात पोलिसानेही उगारला हात, Video

Navi Mumbai : सोन्याच्या व्यवहाराचे आमिष दाखवून डॉक्टरांना दीड कोटींचा गंडा

Thane : सहा कंत्राटदारांच्या आत्महत्येला जबाबदार कोण? महासंघाचा सवाल; ८६ हजार कोटींच्या थकबाकीवरून संताप