छायाचित्र सौजन्य - एक्स @prajakttagore77
महाराष्ट्र

महायुती सरकारला जरांगेंचा निर्वाणीचा इशारा; फडणवीसांची जिरविण्याचा निर्धार! २९ सप्टेंबरपासून पुन्हा उपोषण

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी गुरुवारी पुन्हा एकदा महायुती सरकारला निर्वाणीचा इशारा दिला.

Swapnil S

जालना : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी गुरुवारी पुन्हा एकदा महायुती सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. समाजाच्या मागण्या धसास लावण्यासाठी आता ही आरपारची लढाई असल्याचे सांगून त्यांनी २९ सप्टेंबरपासून पुन्हा उपोषणाला बसण्याची घोषणा केली. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा तोफ डागत जरांगे यांनी फडणवीस यांची जिरविण्याचा निर्धारही व्यक्त केला. सरकारने २८ सप्टेंबरपर्यंत आरक्षण दिले नाही, तर आपण २९ सप्टेंबरपासून उपोषण सुरू करणार असल्याचेही जरांगे यांनी सांगितले.

मनोज जरांगे यांच्या आरक्षणाच्या आंदोलनाला गुरुवारी एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त आयोजित एका छोट्या बैठकीत मनोज जरांगे यांनी गुरुवारी दुपारी अचानक मराठा आरक्षणासाठी २९ सप्टेंबरपासून उपोषण सुरू करण्याची घोषणा केली. आपल्याला काही झाले तरी बेहत्तर, समाजाला आरक्षण मिळवून द्यायचेच आहे. एक मेल्याने काही फरक पडत नाही, काळजी करू नका, आपले कुटुंब उघडे पडले तरी चालेल, पण समाजातील लाखो कुटुंबांचे भले झाले पाहिजे, असे ते म्हणाले.

आपल्याला आता माघार घेऊन चालणार नाही. या सरकारला वठणीवर आणावेच लागेल, कारण हे सरकार निवडणुकांना घाबरत नाही आणि रस्त्यावरच्या आंदोलनालाही भीत नाही. आपण सरकारला २९ सप्टेंबरपर्यंत वेळ देऊ, तोपर्यंत सरकारने आरक्षण दिले तर ठीक, नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज अंतरवाली सराटीत येऊन उपोषणाला बसेल, असे मनोज जरांगे म्हणाले.

आता आरपारची लढाई आहे, जे होईल ते होईल. आपण महिनाभर संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे सर्व जिल्हे व तालुके पिंजून काढणार आहोत, यावेळी देवेंद्र फडणवीस यांची जिरवायचीच आहे, काय व्हायचे ते होऊ द्या, हे रस्त्यावरच्या लढाईला भीत नाहीत, फडणवीसांना मराठ्यांची माया आहे की नाही हे आपण पाहू, त्यांना २९ सप्टेंबरपर्यंत वेळ दिला आहे. त्यानंतर पुन्हा पुढे काय करायचे ते ठरवू, असेही जरांगे म्हणाले.

फडणवीसांना त्यांची जागा दाखवेन!

मनोज जरांगे पुढे म्हणाले की, मागील वर्षभरात माझ्या समाजाचे मोठे नुकसान झाले, अनेकांनी बलिदान दिले, अनेकांचे कुटुंब उघड्यावर पडले, लाखो मुलांवर गुन्हे दाखल झाले, आपल्याला आता हे सहन होत नाही. त्यामुळे २९ सप्टेंबरची लढाई आरपारची होईल. देवेंद्र फडणवीस यांना त्यांची जागा दाखवून देईन, फडणवीस यांनी मराठा समाजाचे बलिदान घेतले आहेत, त्याला तेच जबाबदार आहेत, आपल्याला बलिदान केलेल्या कुटुंबांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे, असेही ते म्हणाले.

फडणवीस यांनी मराठा समाजावर लाठीमार केला. त्यांनी सर्वांवर अन्याय केला. आता २०२४ ला आमचा दणका कळेल. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरदेखील टीका केली. त्यांनी घेतलेली शपथ पूर्ण झाली नाही. सगेसोयरेच्या अंमलबजावणीबाबत आमची फसवणूक झाल्याचे जरांगे म्हणाले. यावेळी उपस्थित महिला व नागरिकांनी मनोज जरांगे यांना हात जोडून उपोषण न करण्याची विनंती केली. पण मनोज जरांगे आपल्या घोषणेवर ठाम होते. आता काहीही झाले तरी आपण मागे हटणार नाही. आपण सर्वजण उपोषण करून या सरकारला ताळ्यावर आणू, असे ते म्हणाले.

फडणवीस यांची जिरविण्याचा निर्धार

मनोज जरांगे म्हणाले की, मुंबईला गेल्याने काही साध्य होणार नाही, गरज पडली तर आपण तेथेही जाऊ, पण तत्पूर्वी सगळा मराठा समाज येथे उपोषणाला बसेल आणि आता सरकार दिलेल्या मुदतीत काय करते हे पाहू. आपण यांचा निवडणुकीतही पराभव करणार आणि त्यांचे ११३ आमदार पाडणार म्हणजे पाडणारच, असा निर्धारही जरांगे यांनी यावेळी व्यक्त केला.

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी