नागपूर : झारखंडमधील माओवादी नेता दिलीप याला यवतमाळ पोलिसांनी अटक केली आहे. दिलीप गेल्या अनेक वर्षांपासून ड्रायव्हर म्हणून लपून बसला होता. यवतमाळ पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्यानंतर झारखंड पोलिसांनी येथे येऊन त्याची ओळख पटवली.
दिलीप हा झारखंड येथील कुख्यात ‘हुहुर्रु दलम’चा नक्षली कमांडर होता. तो २०१३ पासून यवतमाळमध्ये वास्तव्यास असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. तत्पूर्वी त्याने काही वर्षे मुंबईत एका बोअरिंगच्या मशीनवर काम केले होते. त्यानंतर तो यवतमाळ येथे आला होता. येथे तो ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होता. झारखंड पोलिसांनी यवतमाळमध्ये येऊन त्याची ओळख पटवल्यानंतर स्थानिक पोलिसांनी बुधवारी त्याला अटक केली.
दलमच्या आर्थिक व्यवहारात गडबड केल्यानंतर पलायन
दिलीप याच्यावर नक्षली चळवळीसाठी आर्थिक वसुली करण्याची जबाबदारी होती. त्याने भुसुरुंग स्फोटही घडवून आणल्याचा दावा करण्यात येत आहे. पोलिसांसोबतच्या चकमकीत प्रतिहल्ला, सीआरपीएफ जवानाची हत्या केल्याचाही आरोप त्याच्यावर आहे. मात्र, दलमच्या आर्थिक व्यवहारात त्याने गैरव्यवहार केल्यानंतर जिवाच्या भीतीने तो झारखंड सोडून मुंबईत पळाला. तेव्हापासून त्याचे महाराष्ट्रात वास्तव्य आहे.