राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. काल दिवसभरात मराठावड्यातील तीन तरुणांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आपलं आयुष्य संपवलं आहे. तर आज परभणीतील जिल्हाधिकारी कार्यलयात एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवत या तरुणाला अडवल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राजकारण तापलं असताना काल शिर्डीतील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयावर एक चकार शब्द देखील काढला नाही. मोदींनी हा मराठा आरक्षणाचा मुद्दा बेदखल केला. सोलापूर मराठा क्रांती मोर्चाकडून याया निषेध करण्यात आला.
मोदींनी शिर्डीतील सभेत मराठा आरक्षणाबाबत चकार शब्द न काढल्याने संतप्त झालेल्या सोलापूर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केलें पंतप्रधानांना मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी कोणत्याही प्रकारचं गांभिर्य नाही. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनीही समक्ष उपस्थित राहून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने पंतप्रधान मोदी यांचं लक्ष वेधण्याचं धाडस दाखलवं नाही. याबद्दल मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने संताप व्यक्त करण्यात आला आहे.
चार हुतात्मा पुतळ्यासमोर एकत्र आलेल्या मराठा क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या निषेधार्थ तीव्र निदर्शनं केली आणि त्यांच्या पुतळ्यचं दहन केलं. या आंदोलनाचं नेतृत्व राम जाधव यांनी केलं. आगामी दिवसांत गनिमी काव्याने आंदोलन करुन सत्ताधारी नेते व लोकप्रतिनिधींना पळताभुई थोडी करु, असा इशाराही त्यांनी दिला.