पुणे : राज्यात महागडे शिक्षण आणि वाढती बेरोजगारी यामुळे आरक्षणाची मागणी वाढत चालली आहे. परंतु, आरक्षणामुळे जातीजातींमध्ये संघर्ष आणि द्वेषाची भावना निर्माण होत असल्याचे दिसते. सरकारचा आरक्षणाचा हेतू शुद्ध नाही, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी गुरुवारी केला.
मराठा आरक्षणाचा नवा जीआर अवघड आणि जटिल स्वरूपाचा असल्याने तो न्यायालयात टिकेल का? आणि त्याचा मराठ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळेल का? हे पहावे लागेल, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.
आरक्षणाच्या संदर्भातही तसा जीआर काढला गेला आहे, पण तो संदिग्ध असल्यामुळे टिकेल का, हा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच, केंद्र आणि राज्य सरकारने शिक्षणासाठी अत्यंत कमी निधी राखली असल्याने, नागरिकांना दर्जेदार शिक्षण मिळविण्याची संधी कमी आहे. सरकारी भरती प्रक्रियेत जागा रिक्त राहणे आणि कंत्राटी पद्धतीने नोकरभरतीवर अधिक भर दिला जाणे हे देखील समस्येचे मुख्य कारण आहे.
गायकवाड यांच्या मते, दर्जेदार शिक्षण आणि शिक्षणावर निधी वाढवणे हेच खरे उपाय आहेत. फडणवीस सरकारने सुरू केलेली सारथी योजना आणि एसईबी आरक्षण असूनही, त्याचा टिकाव संदिग्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रवीण गायकवाड यांनी मराठा समाजाच्या हितासाठी आगामी रविवार रोजी बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे ‘महाराष्ट्र धर्मासाठी’ कार्यक्रम आयोजित केला आहे, ज्यात सामाजिक प्रबोधनावर आधारित चर्चासत्र पार पडणार आहे.
सरकारकडून अप्रत्यक्ष खतपाणी घालण्याचे काम
शिक्षण अत्यंत महाग झाले असून शैक्षणिक शुल्क सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. दुसरीकडे बेरोजगारीही प्रचंड वाढली आहे. त्यामुळे नागरिक आरक्षणाला पर्याय म्हणून पाहत आहेत. यामुळे विविध जात समूहांमध्ये संघर्ष निर्माण झाला असून, सरकारही अप्रत्यक्ष खतपाणी घालत असल्याचे त्यांनी नमूद केले.