नागपूर : आम्ही मराठा आरक्षण प्रश्नाबाबत पहिल्या दिवसापासूनच गंभीर आहोत. पहिली गोष्ट म्हणजे मराठा आरक्षण हा मजा घेण्याचा प्रश्न नाही. यावर मजा काय आली पाहिजे? हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
परभणी दौऱ्यावर असलेल्या मनोज जरांगे यांनी फडणवीस यांना टीकेचे लक्ष्य केले होते. ते म्हणाले की, “फडणवीस पूर्वी म्हणाले होते की मराठा आरक्षणाला विरोध करत नाही. मीसुद्धा मराठ्यांना आरक्षण द्या, असेच म्हणतोय. आतापर्यंत त्यांनी दुसऱ्यावर ढकलले, पण आता ते आरक्षण देतात की नाही, हे समजेल. आता खरी मजा आहे, हिशोब चुकता करण्याची.”
जरांगेंच्या खोचक प्रतिक्रियेविषयी विचारल्यावर फडणवीस यांनी सांगितले की, “मराठा आरक्षणाच्या प्रश्नामध्ये माझ्यासहित एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तीन प्रमुख नेत्यांमध्ये पहिल्या दिवसांपासूनच भूमिकेत कुठलेच अंतर नाही. आमच्यामध्ये कुठलाही अंतर्विरोध नाही. जे काही निर्णय घेतले आहेत, ते तिघांनी मिळून घेतले आहेत. पुढेही जे निर्णय घेऊ, तेसुद्धा तिघेच मिळून घेऊ.”
२५ जानेवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा
मराठा समाजाला न्याय देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना आता आरपारची लढाई ठरवली आहे. त्यासाठीच मराठा समाजाच्या मागण्यांसाठी जरांगे हे २५ जानेवारीपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत. “मी राहीन अथवा न राहीन, याची पर्वा नाही. पण समाजाला न्याय मिळवून देणार. आतापर्यंत २ कोटीपेक्षा जास्त मराठा बांधवांना आरक्षणाचा फायदा झाला आहे. मराठा आरक्षणाचा, शेतकऱ्यांचा मुद्दा मार्गी लागला की, धनगर आणि मुस्लिम आरक्षणाकडे लक्ष देणार,” असे जरांगे म्हणाले.