मुंबई : जवळपास दोन दशकांपूर्वी ठाकरे परिवारामध्ये दोन वेगवेगळ्या चुली मांडण्यात आल्या होत्या, मात्र मराठी माणसांचा कैवार घेतलेल्या या दोन्ही चुली आता मराठी माणसांसाठी एकत्र पेटणार असून हा केवळ विजयाचा जल्लोष असणार की नव्या राजकीय समीकरणांची नांदी ठरून या चुलींची कायमस्वरूपी ‘मशाल’ धगधगणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
शिवसेना (उबाठा) आणि मनसे यांनी ‘मराठी विजय दिवस’ या कार्यक्रमासाठी मंगळवारी संयुक्त सार्वजनिक आमंत्रण जारी केले आहे. हा कार्यक्रम शनिवार, ५ जुलै रोजी सकाळी १० वाजता वरळी येथील एनएससीआय डोम येथे होणार आहे. ‘मराठीचा आवाज’ या शीर्षकाखालील या आमंत्रणात कोणत्याही पक्षाचा झेंडा किंवा चिन्ह नाही, केवळ महाराष्ट्राचे एक रेखाचित्र दर्शवले आहे. आमंत्रणात आयोजक म्हणून केवळ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची नावे नमूद करण्यात आली आहेत. उद्धव आणि राज ठाकरे हे या सभेस उपस्थित राहणार आहेत, असे शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा लागू करण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध झाल्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी तीन भाषांच्या धोरणावरील दोन सरकारी निर्णय (जीआर) मागे घेतल्याची घोषणा केली. हिंदी भाषा लादण्याविरोधात शिवसेना (उबाठा) आणि मनसे यांनी संयुक्त मोर्चा काढण्याचे ठरवले होते. मात्र सरकारने निर्णय मागे घेतल्यानंतर, दोन्ही पक्षांनी हा मोर्चा रद्द करत मराठी जनतेच्या विजयाचा हवाला दिला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी ५ जुलै रोजी ‘मराठी माणसाच्या एकतेचा’ उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले.
आम्ही वाट बघतोय!
संयज राऊत यांनी शेअर केलेल्या पत्रात म्हटले आहे की, मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवले का, तर हो नमवले, कोणी नमवले, तर तुम्ही मराठी जनतेने, आम्ही केवळ तुमच्यावतीने संघर्ष करत होतो. आता आनंद साजरा करण्याची वेळ आली आहे. आम्ही आयोजक आहोत, पण जल्लोष तुम्हालाच करायचा आहे. वाजत-गाजत, गुलाल उधळत या- आम्ही वाट बघतोय!