छत्रपती संभाजीनगर : राज्यात पावसाळ्यानंतर जलसाठे समाधानकारक असण्याची अपेक्षा असताना यंदा ऑक्टोबरमध्येच अनेक जिल्ह्यांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. मराठवाड्यातील परिस्थिती अधिक चिंताजनक असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी १६९ टँकर सुरू आहेत. भूजलपातळीत झालेली घट आणि अनेक धरणांमधील कमी साठा यामुळे आगामी उन्हाळ्यात टंचाई अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार, जायकवाडी प्रकल्पात १,६७३ दशलक्ष घनमीटर म्हणजे सुमारे ७७ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रा तील पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मात्र, मांजरा प्रकल्पात केवळ ६५ दशलक्ष घनमीटर म्हणजे १०.३० टक्के साठा शिल्लक आहे. सिद्धेश्वर आणि सीना-कोळेगाव प्रकल्पांतील पाणीसाठा शून्यावर आल्याची माहिती देण्यात आली आहे. दुधना प्रकल्पात १९ टक्के, तर माजलगाव प्रकल्पात २७टक्के पाणी शिल्लक आहे.
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या ऑक्टोबरमधील पहिल्या आठवड्याच्या अहवालानुसार, राज्यातील दहा जिल्ह्यांमधील ६३५ गावे आणि २,४४७ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा १६९ टँकरसह आघाडीवर आहे. बीड जिल्ह्यात १६६, तर अहिल्यानगर जिल्ह्यात १६१ टँकर सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.