छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा विभागात यंदा सरासरीपेक्षा २०.३ टक्के कमी पाऊस झाल्याने लागवडीखालील क्षेत्र तब्बल ३.५ लाख हेक्टरने घटले आहे. यंदा मराठवाड्यात ४६.१९ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, ती गेल्या पाच वर्षांच्या सरासरी ४९.७२ लाख हेक्टरच्या तुलनेत सात टक्क्यांनी कमी आहे.
तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत हे क्षेत्र २ लाख हेक्टरने घटले आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, धाराशिव आणि लातूर या आठ जिल्ह्यांचा समावेश असलेल्या मराठवाड्यात ५८६.१ मिमी अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ ४७९.१ मिमी पाऊस झाला आहे. दुसऱ्या एका अधिकृत अहवालानुसार, परभणी (३४.७ टक्के तूट) आणि लातूर (४०.६ टक्के तूट) या जिल्ह्यांमध्ये ही घट अधिक तीव्र आहे.
नगदी पिकांना फटका
पावसाच्या तुटीचा सर्वाधिक फटका नगदी पिकांना बसला आहे. कापूस लागवडीखालील क्षेत्र २.६५ लाख हेक्टरने घटून १२.१४ लाख हेक्टरवर आले आहे. तर ऊसाची सरासरी ३.२४ लाख हेक्टरवरून घसरून यंदा केवळ ४३,८२१ हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. पावसाच्या अनिच्छेमुळे शेतकऱ्यांनी आपला मोर्चा सोयाबीन, मका आणि सूर्यफूल या पिकांकडे वळवला आहे.
सोयाबीन, मका लागवड वाढली
सोयाबीनचे लागवड क्षेत्र १२ टक्क्यांनी वाढून २५.७४ लाख हेक्टरवर पोहोचले आहे. तर मका लागवड क्षेत्रात ५ टक्क्यांची वाढ झाली असून ते २.६८ लाख हेक्टर झाले आहे. सूर्यफूल लागवडीत ३९ टक्क्यांची मोठी वाढ नोंदवली गेली असून क्षेत्र २,२८९ हेक्टरवर पोहोचले आहे.