सामूहिक कॉपीप्रकरणी १०३ शिक्षक निलंबित; दहावी-बारावी परीक्षेदरम्यान गोपनीयतेचा भंग केल्याने सर्वात मोठी कारवाई 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

सामूहिक कॉपीप्रकरणी १०३ शिक्षक निलंबित; दहावी-बारावी परीक्षेदरम्यान गोपनीयतेचा भंग केल्याने सर्वात मोठी कारवाई

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावी परीक्षेदरम्यान झालेल्या सामूहिक कॉपी प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून मंडळाने तब्बल १०३ शिक्षकांना निलंबित केले आहे, तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी आणि शिक्षकांनी परीक्षेच्या गोपनीयतेचा भंग केला आहे किंवा गैरप्रकारांना खतपाणी घातले आहे, त्यांच्यावर गुन्हे (एफआयआर) दाखल करण्याची प्रक्रिया देखील मंडळाकडून सुरू करण्यात आली आहे.

Swapnil S

पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावी परीक्षेदरम्यान झालेल्या सामूहिक कॉपी प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून मंडळाने तब्बल १०३ शिक्षकांना निलंबित केले आहे, तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी आणि शिक्षकांनी परीक्षेच्या गोपनीयतेचा भंग केला आहे किंवा गैरप्रकारांना खतपाणी घातले आहे, त्यांच्यावर गुन्हे (एफआयआर) दाखल करण्याची प्रक्रिया देखील मंडळाकडून सुरू करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांविरुद्ध केलेली आतापर्यंतची ही सर्वात मोठी आणि कठोर कारवाई ठरली आहे. गेल्या काही काळापासून परीक्षा केंद्रांवर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी मंडळाने ‘सीसीटीव्ही’रूपी ‘तिसऱ्या डोळ्या’चा वापर केला आहे.

बीड, छत्रपती संभाजीनगर केंद्रांवर गुन्हे दाखल

बीड, चौसाळातील कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात केंद्र क्र.२२४ येथे १० फेब्रुवारीला पहिल्याच पेपरला सामूहिक कॉपी करण्यात आल्याचे उघड झाले. प्रशासनाने १७ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित केले. तसेच यशवंत विद्यालयाचे केंद्र संचालक ए. एम. राऊत यांच्यावरही निलंबनाची कारवाई झाली आहे. तर छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड जैतापूर येथील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालयात केंद्र क्र. ००७९ येथे सीसीटीव्हीमध्ये पर्यवेक्षकच विद्यार्थ्यांना मदत करताना दिसले. याप्रकरणी २४ जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले असून २१ जणांना निलंबित करण्यात आले आहे.

वाशिम जिल्हा ठरला गैरप्रकारांचा केंद्रबिंदू

वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक ठिकाणी कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. जुमडा फाटा येथील श्री मैनागिरी महाराज कनिष्ठ महाविद्यालयात १६ फेब्रुवारीला भौतिकशास्त्राच्या पेपरला तब्बल ५८१ विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. तर केंद्रे शेंदूर्जाना आढाव (३ कर्मचारी निलंबित), रुईगोस्ता (५ कर्मचारी निलंबित), मांडवा (७ कर्मचारी निलंबित), रिसोड (३ कर्मचारी निलंबित) आणि लेहणी केंद्रावर सीसीटीव्हीच्या आधारे २ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

गुन्हे होणार दाखल

या प्रकरणातील तपासात दोषी आढळलेल्या १०३ शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, केवळ निलंबनावरच न थांबता, ज्या कर्मचाऱ्यांनी आणि शिक्षकांनी परीक्षेच्या गोपनीयतेचा भंग केला आहे किंवा गैरप्रकारांना खतपाणी घातले आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया देखील मंडळाकडून सुरू करण्यात आली आहे.

सीसीटीव्हीच्या सहाय्याने पकडले गैरप्रकार

परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शिक्षण मंडळाने ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांचे जाळे अधिक भक्कम केले होते. या तंत्रज्ञानाचा केलेला वापर यशस्वी ठरला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या सखोल तपासणीतून सामूहिक कॉपीबाबतचे अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. ज्या केंद्रांवर नियम धाब्यावर बसवून विद्यार्थ्यांना कॉपीसाठी मदत केली जात होती, अशा केंद्रांवरील सीसीटीव्ही फुटेज हे पुरावा म्हणून वापरण्यात आले आहेत.

Maratha Reservation : मनोज जरांगेंची मोठी घोषणा; मोर्चा मुंबईत धडकणार, जाण्याचा मार्गही ठरला

इंटरनेटशिवाय UPI पेमेंट? RBI च्या नव्या सुविधेने काय बदलणार? जाणून घ्या सविस्तर

महाबळेश्वर-पाचगणी परिसरात स्ट्रॉबेरी लागवडीची लगबग सुरू; मजूर टंचाई, वाढती रोजंदारी आणि उत्पादन खर्चामुळे शेतकरी चिंतातूर

SRA कडून ४५० हून अधिक निष्क्रिय विकासकांची हकालपट्टी

Ganeshotsav 2026 : मुंबईकरांना घरबसल्या मिळणार उकडीचे अन् तळलेले मोदक; BMC च्या महिला बचत गटांचा खास उपक्रम