माथेरान : थंड हवामान आणि निसर्गसौंदर्यामुळे पर्यटकांचे आकर्षण ठरणाऱ्या माथेरानमध्ये रविवारी परतीच्या प्रवासात मोठी अडचण निर्माण झाली. नेरळ-माथेरान घाटात टॅक्सीचालकांनी अचानक बंद पुकारल्यामुळे हजारो पर्यटक रस्त्यावर अडकले.
रविवारी सकाळी ११ च्या सुमारास नेरळ पोलीस स्टेशनमार्फत घाटात काही टॅक्सी चालकांवर शिस्तभंग, ड्रेस कोड न पाळणे आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेणे, यावर कारवाई करण्यात आली. या कारवाईचा निषेध म्हणून चालकांनी घाटातच टॅक्सी थांबवत अचानक सेवा बंद केली. परिणामी, दुपारी तीन वाजेपर्यंत घाटात संपूर्ण वाहतूक ठप्प झाली.
'वॉटर पाईप' भागात टॅक्सीचालक आणि पर्यटकांमध्ये जोरदार वाद झाला. बाचाबाचीमुळे काही वेळ वाहतूक पुन्हा ठप्प झाली होती. मात्र, पर्यटकांनी संयम राखत मार्ग मोकळा केला आणि वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली.
प्रशासनाच्यावतीने ढवळे यांनी स्पष्ट भूमिका मांडत, टॅक्सीचालकांना नियम पाळण्याच्या सूचना दिल्या. पोलीस कारवाई नियमबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, आमदार महेंद्र थोरवे यांनी तातडीने हस्तक्षेप करत वाद तात्पुरता निवळला.
पर्यटकांची गैरसोय आणि नाराजी
परतीच्या मार्गावर असलेल्या हजारो पर्यटकांना उन्हात, पाण्याच्या अभावात आणि प्रवासात अडथळ्यामुळे तासन्तास थांबावं लागलं. दस्तुरी कार पार्किंगजवळ टॅक्सी न आल्यामुळे रांगा लागल्या. काही चालकांनी घाटातच चालत येणाऱ्या पर्यटकांना अडवून परत नेल्याने पार्किंगजवळ टॅक्सी पोहोचतच नव्हत्या.
पर्यायी मार्गाची गरज अधोरेखित
नेरळ-माथेरान घाट हा एकमेव रस्ता असल्याने, छोट्या घटना देखील मोठा परिणाम करतात. आजच्या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून माथेरानच्या पर्यटन प्रतिमेला धक्का बसतो आहे. ट्रॅफिक जाम आणि वादामुळे अनेक पर्यटक नाराज होऊन निघून गेले. त्यामुळे पर्यायी रस्त्याची गरज आता पुन्हा अधोरेखित झाली आहे.