मुंबई : अमलीपदार्थांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन तस्करी करणाऱ्यांना मकोका लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक या अधिवेशनात मांडले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली.
राज्यात अमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याबाबत आमदार डॉ.परिणय फुके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. मेफेड्रॉन तस्करीत महाराष्ट्र सर्वात मोठे केंद्र बनले आहे. गेल्या तीन वर्षांत देशभरातील मेफेड्रॉनच्या एकूण ७६ टक्के प्रकरणांपैकी १ हजार ४८६ प्रकरणे ही राज्यातील आहेत. यावर पोलिसांनी काय कारवाई केली आणि तस्करीला आळा घालण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या, असा प्रश्न परिणय फुके यांनी उपस्थिती केला.
या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात एमडीला आळा घालण्यासाठी २०२२ मध्ये ३०३ गुन्हे, २०२३ मध्ये ६४२ गुन्हे आणि २०२४ मध्ये ५४५ गुन्हे दाखल झाले. गेल्या पाच वर्षांत एएनसी मुंबई पोलीस, महसूल गुप्तचर संचालनालय आणि एनसीबी (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) यांनी अमली पदार्थांच्या निर्मिती करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई केली. एएनसी मुंबई पोलिसांनी या प्रकरणी १२ गुन्हे दाखल करत ७५ आरोपींना अटक केली. तसेच महसूल गुप्तचर संचालनालयाने ४ गुन्हे दाखल करून २२ जणांना अटक केली तर एनसीबीने ३ गुन्हे दाखल केले आहेत.
प्रत्येक पोलीस ठाण्यात एनडीपीएस युनिट
अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा बसावा, यासाठी मागील अधिवेशनात स्थापन केलेला टास्क फोर्स यावेळी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाला आहे. काही ठिकाणी एनडीपीएसचे युनिट जिल्हा स्तरावर कार्यरत होते. आता प्रत्येक पोलीस ठाण्यात एनडीपीएसचे युनिट स्थापन केले असून अधिकारी आणि अंमलदाराही त्यांना देण्यात आले आहेत.
मुक्ताईनगरमध्ये अफू, गांजा तस्करी
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे यांनी मध्य प्रदेश, गुजरातमधून जळगाव मुक्ताईनगर येथे अफू आणि गांजाची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याचा मुद्दा मांडला. यावर फडणवीस यांनी सांगितले की, मात्र आपल्याकडे परवानगी नाही. असे प्रकार होत असतील तर त्यावर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाईल.