(संग्रहित छायाचित्र) 
महाराष्ट्र

अलिबागचा औषधी पांढरा कांदा बाजारात दाखल; यंदा अवकाळी पावसामुळे कांद्याचे उत्पादन उशिराने

रुचकर चव आणि औषधी गुणधर्मामुळे नावारुपाला आलेल्या अलिबागचा पांढरा कांदा यंदा काढणीस सुरुवात झाली असून हा कांदा आता विक्रीसाठी बाजारात येऊ लागला आहे.

Swapnil S

धनंजय कवठेकर/ अलिबाग

रुचकर चव आणि औषधी गुणधर्मामुळे नावारुपाला आलेल्या अलिबागचा पांढरा कांदा यंदा काढणीस सुरुवात झाली असून हा कांदा आता विक्रीसाठी बाजारात येऊ लागला आहे. लहान कांदा २०० रुपये माळ तर मोठा कांदा २५० रुपये माळ अशा दराने सध्या हा कांदा विकला जात आहे. यंदा अवकाळी पावसामुळे पांढरा कांदा काहीसा उशिरा बाजारात आला आहे.

अलिबाग तालुक्यातील प्रामुख्याने नेहुली, खंडाळे, कार्ले, तळवली या गावांमध्ये पांढऱ्या कांद्याचे पिक घेतले जात असे. त्यानंतर आलिबाग तालुक्यात इतरही गावांमध्ये पांढऱ्या कांद्याची लागवड शेतकरी करू लागले. अलिबाग तालुक्यात २५० हेक्टरवर पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यात आली आहे. पांढऱ्या कांद्यांच्‍या काढणीचे काम सध्‍या वेगात सुरू असून वाळलेल्‍या कांद्याच्‍या वेण्‍या बनवण्‍याचे काम सुरू झाले आहे. यातून महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्‍ध होत आहे. व्यापारी शेतकऱ्यांच्‍या बांधावर येवून कांद्याची उचल करीत असल्यामुळे नवीन कांद्याला चांगला भावदेखील मिळत असल्याचा आनंद शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

रायगड जिल्ह्यात खरीप हंगामात भातपिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होत असते, मात्र रब्बी हंगामात सिंचन क्षेत्र वगळता फारशी पिक घेतली जात नाही. जिल्ह्यात ओलिताखालील क्षेत्र फारसे नसल्याने दुबार शेती फारशी केली जात नाही. पण अलिबाग तालुका त्याला अपवाद ठरतो. भात कापणीनंतर जमिनीतील ओलावा दोन महिने टिकत असल्याने अलिबाग तालुक्यात पांढरा कांदा यासारख्या पिकांची लागवड केली जाते. ज्यातून चांगले उत्पन्न शेतकऱ्यांना मिळते.

अवकाळीचा फटका

यावर्षी झालेल्‍या अवकाळीचा फटका पांढऱ्या कांद्याला बसला आहे. तमिळनाडूमध्‍ये किनारपट्टीवर आलेल्‍या चक्रीवादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर झाल्याचे दिसून आले. अवकाळी पाऊस झाल्‍याने लागवड उशिरा झाली, काही ठिकाणी कांद्याची रोपे कुजली शेतकऱ्यांना पुनर्लागवड करावी लागली होती. रोपांची वाढ देखील अपेक्षित झाली नाही. त्‍यामुळे पांढरा कांदा बाजारात दरवर्षीच्‍या तुलनेत उशिरा दाखल झाला आहे.

औषधी गुणधर्म

अभ्यासकांच्या माहितीनुसार, या कांद्यात औषधी गुणधर्म आहेत. कांद्यात मिथाईल सल्फाईड आणि अमीनो ॲसिड हे घटक असतात. ज्यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. पोटातील उष्णता कमी होण्यासाठी कांदा उपयुक्त ठरतो.

भौगोलिक मानांकन मिळाल्याने पांढऱ्या कांद्याला मागणी वाढली आहे. मुंबई-पुण्यासारख्या महानगरातून कांद्यासाठी मोठी मागणी केली जात आहे. यंदा हवामान चांगले होते. त्यामुळे पीकही जोमाने आले आहे. कांद्याच्या काढणीला सुरुवात झाली असून येत्या काही दिवसांत कांदा बाजारात मुबलक प्रमाणात दाखल होईल.

- सतीश म्‍हात्रे, शेतकरी, कार्ले

महाराष्ट्र जनविश्वास अध्यादेश : किरकोळ अपराधासाठी आता फक्त दंड, तुरुंगवास नाही; ७ कायद्यांतील छोटे गुन्हे 'डिक्रिमिनलाइज'

Navi Mumbai : वन खात्याच्या बोटचेप्या धोरणाचा फटका महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना; आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटीसह अनेकांवर परिणाम

तिरुमला तिरुपती देवस्थानास वांद्रे येथील जमीन; ३० वर्षांसाठी नाममात्र १ रुपया भाडे; ३९५ चौ.मी जमिनीवर पार्किंग, कार्यालय

Mumbai : बिग बींची स्मार्ट गुंतवणूक! अमिताभ बच्चन यांनी विकले गोरेगावमधील दोन आलिशान फ्लॅट्स; १३ वर्षांत तब्बल ३.८ कोटींचा नफा

'पान मसाला' जाहिरातीवरून सलमान खानला नोटीस; भाजप नेत्याने दाखल केली तक्रार