पुणे/मुंबई : दहावी, बारावीच्या परीक्षा ऐन तोंडावर आल्या असून सध्या विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यासात गुंतले आहेत. दहावी, बारावी परीक्षेचे हॉल तिकीट विद्यार्थ्यांना सोमवारपासून ऑनलाइन डाऊनलोड करता येणार आहे. मात्र या हॉल तिकीटवर जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आल्याने नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षणतज्ज्ञांनी या घटनेवर आक्षेप नोंदवला असला तरी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून याबाबत सारवासारव करत स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण माध्यमिक शिक्षण व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतली जाणारी इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा आता सुरू होणार आहे. या परीक्षेला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना, शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर जातीच्या प्रवर्गाचा उल्लेख केल्यामुळे एक नवा वाद निर्माण झाला आहे.
शाळेत विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख काय झाला आहे, त्यांच्या जातीचा प्रवर्ग कोणता आहे, याची माहिती विद्यार्थी आणि पालकांना मिळावी यासाठी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मात्र शाळेच्या दाखल्यावरून जातीची नोंद काढून टाकण्याची मागणी होत असताना बोर्डाने हा निर्णय घेतल्यामुळे पालक तसेच शिक्षणतज्ज्ञांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
एकीकडे शाळेच्या दाखल्यावरून जातीचा रकाना हटवण्याची मागणी होत असताना शिक्षण मंडळाकडून अवघ्या १५ दिवसांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या हॉल तिकिटावर जात प्रवर्गाचा उल्लेख केल्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. शिक्षण विभागाने यंदा दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटमध्ये काही बदल केले असून त्यामध्ये विद्यार्थी कोणत्या जातीच्या प्रवर्गात मोडतो, हे हॉल तिकीटवर असलेल्या रकान्यात दिसत आहे.
“शाळा सोडल्यानंतर शाळेच्या किंवा कनिष्ठ महाविद्यालयाच्या जनरल रजिस्टरमध्ये विद्यार्थ्याला त्याचे नाव, त्याच्या पालकांचे नाव, जात अथवा जात प्रवर्गात कुठलीही चूक झाली असेल तर ती दुरुस्त करून येत नाही. अनेकदा विद्यार्थ्यांच्या जातीचा अथवा प्रवर्गाचा उल्लेख चुकलेला असतो. त्यामुळे भविष्यात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक विद्यार्थी अशा तक्रारी घेऊन आमच्याकडे येतात. नियमानुसार विद्यार्थ्यांनी एकदा का शाळा सोडली, त्याला शाळेच्या जनरल रजिस्टरमध्ये त्याचे नाव, आडनाव, आई-वडिलांचे नाव, जन्मतारीख किंवा जातीच्या उल्लेखात कोणताही बदल करता येत नाही. यात एखादी चूक असेल तर हे हॉल तिकीट त्यांच्या उपयोगी पडणार आहे. हॉल तिकिटावर एखादी चूक असेल तर ती आत्ताच निदर्शनास आणून देता येईल आणि दुरुस्त करून घेता येईल. या एकमेव उदात्त हेतूने राज्य शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटांवर जात प्रवर्गाची नोंद केली आहे. यामुळे विद्यार्थ्याला त्याच्या नावातच काय, इतर कोणत्याही गोष्टीत चूक असेल तर ती बदल करण्याची संधी मिळते,” असेही गोसावी यांनी सांगितले.
गोसावी यांच्या स्पष्टीकरणावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कोणतीही शिष्यवृत्ती मिळवायची असेल तर जात प्रमाणपत्र विचारात घेतले जाते, हॉल तिकीट विचारात घेतले जात नाही. मग हॉल तिकिटावर असा उल्लेख का करण्यात आला? असा सवाल विचारला जात आहे.
दहावीचे हॉल तिकीट सोमवारपासून मिळणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट सोमवार, २० जानेवारीपासून ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी हॉल तिकीट प्रिंट करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क आकारू नये, असे राज्य शिक्षण मंडळाने स्पष्ट केले. बारावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट सध्या वितरीत केले जात आहे. बारावीच्या परीक्षेला ११ फेब्रुवारीपासून, तर दहावीच्या परीक्षेला २१ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.
शिक्षण विभागाचा काय उद्देश? - सुषमा अंधारे
“दहावी आणि बारावी हे शैक्षणिक आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे आहेत. किंबहुना मैलाचे दगड आहेत. या वयात विद्यार्थ्यांवर सर्वसमावेशक, समता आणि समाजव्यवस्थेचा संस्कार होणे अपेक्षित असते. मात्र, शैक्षणिक मंडळाकडून मुलांच्या हॉल तिकीटवर जातीची नोंद होणार असेल, तर शिक्षण मंडळाचा उद्देश हा जात निर्मूलन किंवा सर्वसमावेशक समत समुलक व्यवस्था प्रस्थापित करणे आहे, याचे उत्तर शिक्षण मंडळाने द्यायला हवे,” असा सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विचारला आहे.
शिक्षण मंडळाचेही स्पष्टीकरण
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यावर स्पष्टीकरण देताना म्हणाले की, “हॉल तिकिटांवर विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख नाही तर जातप्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे, म्हणजे ओबीसी, एसटी, एससी असा उल्लेख आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हा उल्लेख केला आहे. आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभागाकडून विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती दिल्या जातात. त्या शिष्यवृत्ती घेताना विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी त्यांच्या हॉल तिकिटांवर जातप्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे.