मुंबई : रायगड जिल्ह्यातील १४ वर्षीय बलात्कार पीडितेला २४ आठवड्यांच्या गर्भधारणेनंतर गर्भपात करण्याची परवानगी उच्च न्यायालयाने दिली.
न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायामूर्ती निला गोखले यांच्या खंडपीठाने अल्पवयीन मुलगी गर्भपात प्रक्रिया करण्यास योग्य असल्याची पुष्टी डॉक्टरांनी केल्यानंतर या बलात्कार पीडित मुलीला मोठा दिलासा दिला.
इन्स्टाग्रामवर भेटलेल्या पुरुषाने केलेल्या लैंगिक अत्याचारातून वाचलेली अल्पवयीन मुलगी २४ आठवड्याची गरोदर असल्याचे उघड झाले. वैद्यकीय तपासणीत मुलगी गर्भवती असल्याची पुष्टी रुग्णालयाने दिली. त्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पिडीत मुलीच्या वतीने मनीषा जगताप यांनी युक्तीवाद करताना मुलगी गर्भधारणा पूर्ण करण्यास असमर्थ असल्याचे सांगितले. वैद्यकीय गर्भपात कायद्यानुसार, न्यायालयाच्या परवानगीशिवाय २० आठवड्यांपर्यंत गर्भधारणा संपुष्टात आणता येते. मुलीने ही मर्यादा ओलांडली असल्याने प्रक्रियेसाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असल्याचे न्यायालयाच्या निर्देशनास आणून दिले.
याची दखल घेत खंडपीठाने अलिबाग येथील सिव्हिल हॉस्पिटलच्या सर्जनला अल्पवयीन मुलीच्या स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचे निर्देश दिले होते.
वैद्यकीय मंडळाचे निष्कर्ष
पीडीत अल्पवयीन मुलगी आता गर्भपाताची प्रक्रिया करण्यासाठी योग्य आहे. या प्रक्रियेमुळे भविष्यात मुलीच्या गर्भधारणेच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकेल अशाप्रकारे कोणतीही गुंतागुंतीची परिस्थिती नाही, असे डॉक्टरांनी न्यायालयाला सांगितले. त्याची दखल घेत खंडपीठाने पिडीत मुलीला २४ आठवड्यांच्या गर्भधारणेनंतर गर्भपात करण्याची परवानगी दिली.