मुंबई : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी २७ मार्चला निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून १० मार्चपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. या निवडणुकीचा निकाल २७ मार्चलाच जाहीर होणार आहे. विधान परिषदेतील पाच आमदार विधानसभेवर निवडून गेल्याने परिषदेतील पाच जागा रिक्त झाल्या आहेत. विधान परिषदेतील भाजपचे तीन, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाचे प्रत्येकी एक सदस्य विधानसभेवर निवडून आल्याने या पाच जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
नोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने विधान परिषदेचे सदस्य असलेल्या आमशा पाडवी, गोपीचंद पडळकर, राजेश विटेकर, प्रवीण दटके आणि रमेश कराड यांना उमेदवारी दिली होती. आमशा पाडवी (अक्कलकुवा), गोपीचंद पडळकर (जत), राजेश विटेकर (पाथरी), प्रवीण दटके (नागपूर मध्य) आणि रमेश कराड हे लातूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यामुळे त्यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे रिक्त जागांवर निवडणुका घेण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे.
अशी पार पडणार निवडणूक प्रक्रिया
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी १० मार्च रोजी अधिसूचना प्रसिद्ध होणार असून, उमेदवारी अर्ज त्याच दिवसापासून दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १७ मार्च आहे. १८ मार्च रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २० मार्च ही शेवटची तारीख आहे. २७ मार्च रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ४ या वेळेत मतदान होईल व मतदान पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल.