महाराष्ट्र

आता मुंबई लोकलचाही खोळंबा होतोय, तातडीने उपाय शोधा; जवळच नोकऱ्या निर्माण करा - सत्यजित तांबेंची मागणी

रस्त्यानंतर आता मुंबईच्या रेल्वे नेटवर्कचाही खोळंबा होतोय...गेल्या काही आठवड्यांपासून मुंबईला जाणाऱ्या आणि येणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांसोबतच मुंबईत ये-जा करणाऱ्या लोकल गाड्यांनाही प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

Swapnil S

मुंबईची लोकल ही मुंबईकरांची 'लाईफलाईन' समजली जाते. मात्र, गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने मुंबईच्या जलद आणि धिम्या दोन्ही मार्गांवरील लोकलला विलंब होतोय. या पार्श्वभूमीवर, विधान परिषदेचे आमदार सत्यजीत तांबे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची आणि 'लोकल खोळंबा' सोडवण्यासाठी एकात्मिक वाहतूक धोरणाची मागणी केली आहे. रोजगारासाठी मुंबईकडे धाव घेणाऱ्यांसाठी त्यांच्या शहराजवळ नोकऱ्या कशा निर्माण करता येतील याचाही विचार व्हायला हवा, असेही ते म्हणाले.

रेल्वेमंत्र्यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी करीत तांबे म्हणाले, "रेल्वे मंत्रालय आणि केंद्र सरकारने मुंबई महानगर प्रदेशात राहणाऱ्या लोकांसाठी एकात्मिक वाहतूक धोरण आखण्याची गरज आहे. रोजगारासाठी मुंबईकडे धाव घेणाऱ्यांसाठी त्यांच्या शहराजवळ नोकऱ्या कशा निर्माण करता येतील, याचाही विचार व्हायला हवा. तसेच, मल्टीमॉडल कॉरिडॉर, सार्वजनिक वाहतुकीची इतर साधने आणि त्यांचे उपनगरीय रेल्वेशी एकीकरण युद्धपातळीवर करणे आवश्यक आहे."

"मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या उपनगरीय रेल्वेची सेवा गेल्या अनेक महिन्यांपासून दररोज उशिराने धावत आहे. मध्य रेल्वेवरील लोकल गाड्यांना नेहमीच 15-20 मिनिटे विलंब होतो . लांब पल्ल्याच्या गाड्याही नियोजित वेळेपेक्षा दोन-तीन तास उशिराने धावतात. यामुळे मुंबई महानगर प्रदेशात राहणाऱ्या लाखो प्रवाशांना त्रास होत आहे. एकात्मिक वाहतूक धोरण ही काळाची गरज आहे," असेही तांबे म्हणालेत.

"रस्त्यांनंतर आता मुंबईच्या रेल्वे नेटवर्कचाही खोळंबा होतोय...गेल्या काही आठवड्यांपासून मुंबईला जाणाऱ्या आणि येणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांसोबतच मुंबईत ये-जा करणाऱ्या लोकल गाड्यांनाही प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाने आणि सरकारने याकडे तातडीने लक्ष देण्याची आणि अखंड व एकात्मिक वाहतूक उपाय शोधण्याची नितांत गरज आहे", अशी पोस्ट देखील त्यांनी केली आहे. मल्टीमॉडल कॉरिडॉर, सार्वजनिक वाहतुकीची इतर साधने आणि त्यांचे उपनगरीय रेल्वेशी एकीकरण युद्धपातळीवर करणे आवश्यक आहे, असेही तांबे म्हणालेत.

मुंबई-नाशिक मार्गावरील वाहतूक कोंडी असो किंवा समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न असो, महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या मॉडेलबाबत तांबे यांनी सातत्याने प्रश्न उपस्थित केले आहेत.

मुंबईतील हॉटेल्स, बार, बेकऱ्या FDA च्या रडारवर; ख्रिसमस-नववर्षाच्या तोंडावर तपासणी मोहीम

मुंबईच्या हवा गुणवत्तेसाठी 'मानस'ची निर्मिती; IIT Kanpur च्या सहकार्याने BMC राबवणार प्रकल्प

Mumbai : 'कूपर'मध्ये बेडवरून रुग्ण पडण्याच्या घटनांत वाढ; नातेवाईकांकडून सुरक्षेची मागणी

Thane RTO : वाहनधारकांनो तुम्ही HSRP नंबर प्लेट बसवली? 'डेडलाईन' जारी; त्वरित ऑनलाइन अर्जाद्वारे अपॉइंटमेंट घेण्याचे आवाहन

"सरकारचे प्राधान्य शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला नाही तर...; सुप्रिया सुळेंची सत्ताधाऱ्यांवर टीका