Weather Update : मान्सून वेळेवरच येणार; ‘एल निनो’मुळे यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

Weather Update : मान्सून वेळेवरच येणार; ‘एल निनो’मुळे यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी

यंदा मान्सून निर्धारित वेळेतच अंदमान-निकोबार बेटांवर दाखल होणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी वर्तविला.

Swapnil S

पुणे : यंदा मान्सून निर्धारित वेळेतच अंदमान-निकोबार बेटांवर दाखल होणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी वर्तविला. या अंदाजामुळे मान्सून देवभूमी केरळातदेखील सक्रिय होण्याची आशा निर्माण झाली आहे. साधारणपणे मान्सून १८ ते १९ मे दरम्यान अंदमान-निकोबार बेटांवर दाखल होतो. यंदादेखील तो याचदरम्यान बेटांवर आगमन करणार असल्याचे सूतोवाच हवामान विभागाने केले आहे.

प्रशांत महासागरात यंदा ‘एल निनो’ निर्माण होणार असून, त्याचा परिणाम यंदाच्या मान्सूनवर होणार आहे. त्यामुळे यंदा सरासरीपेक्षा पाऊस कमी बरसणार आहे. यावर्षी हवामान विभागाने जून ते सप्टेंबरच्या कालावधीत सरासरीच्या ९२ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

साधारणपणे मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात (ऑगस्ट ते सप्टेंबर) एल निनो सर्वाधिक प्रभाव टाकणार असून, या कालावधीत पावसाची तूट अधिक असणार आहे. याशिवाय २०२७ सालच्या सुरुवातीपर्यंत ‘एल निनो’चा प्रभाव राहणार असल्याचे सांगितले जात आहे,त्यामुळे भारतीय हिवाळ्यावरदेखील परिणामाची शक्यता आहे. प्रशांत महासागरात निर्माण होणाऱ्या गरम पाण्याच्या प्रवाहांना ‘एल निनो’ म्हणतात. हे प्रवाह नैऋत्य मोसमी वारे भारताच्या दिशेने घेऊन येत असलेले बाष्प खेचून घेत असल्याने भारतीय भूमीवर पाऊस कमी पडतो. त्यामुळे एल निनोचे महत्त्व मान्सूनसाठी अधिक आहे.

कोकणात १३ मेपर्यंत तापमान अधिक

हवामान विभागाच्या ताज्या अहवालानुसार, २१ मेपर्यंत पूर्वोत्तर भारत, दक्षिण भारतात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. तर १३ मेपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान अधिक राहील. त्यानंतरच्या आठवड्यात १४ ते २१ मे दरम्यान, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात सरासरीपेक्षा अधिक कमाल तापमान राहील.

कोकणात मे अखेरीस पाऊस

तिरुवनंतपुरम : संपूर्ण कोकण पट्ट्यात पुढील १५ दिवस रात्रीचे तापमान अधिक राहील. महाराष्ट्रात पुढील आठवडाभर पाऊस कमी राहणार असून, १४ ते २१ मे यादरम्यान तळकोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, केरळमध्ये पुढील काही दिवसांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून राज्यातील ८ जिल्ह्यांत 'यलो अलर्ट' जारी केला आहे. केरळ आणि माहेसह तमिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, लक्षद्वीप आणि अंतर्गत कर्नाटकात पुढील ५ दिवसांत विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस आणि ३० ते ५० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ११ ते १३ मे दरम्यान जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमध्ये पुन्हा जोरदार पाऊस होणार आहे.

नाशिक टीसीएस प्रकरण : निदा खानला अखेर संभाजीनगरात अटक; MIM नगरसेवक सहआरोपी, दोन स्मार्टफोन जप्त, महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता

दहावीचा निकालात कोकण मंडळाची बाजी; मुलींचे वर्चस्व कायम, राज्याची टक्केवारी घसरली

आजचे राशिभविष्य, ९ मे २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

आमच्या संधी मारल्या ही मतलबी ओरड कशासाठी?

Mother’s Day 2026 : 'ही' स्मार्ट उपकरणं तुमच्या आईसाठी ठरतील बेस्ट; घरकाम होईल सोपं, पाहा Photos