महाराष्ट्र

कोकणात मान्सून पुन्हा सक्रिय; जून अखेरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईत ढगाळ वातावरण

Swapnil S

मुंबई : आठवडाभर विश्रांती घेतलेला पाऊस कोकण पट्ट्यात पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. अरबी समुद्रात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने जून अखेरपर्यंत मुंबईसह कोकण पट्ट्यात मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता कुलाबा हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, मुसळधार पावसाचा अंदाज बघता कोकण पट्ट्यात ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मुंबईत सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरण असून, उन्हाच्या काहिलीपासून मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

दरवर्षी ११ जूनपर्यंत मुंबईत मान्सूनची एंट्री होते. यंदा मात्र दोन दिवस आधीच मान्सून डेरेदाखल झाला आणि मुंबईत पावसाची दमदार इनिंग सुरू होईल, असे वाटत असतानाच तो गायब झाला. ९ जूनला रविवारी रात्री बरसल्यानंतर पावसाने काही दिवस विश्रांती घेतली. मात्र, पुन्हा एकदा पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सोमवारी मुंबईसह राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण होते. पुढील आठ ते दहा दिवस पाऊस चांगला बरसणार असून, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण पट्ट्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे कोकणात ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मुंबईतही अधूनमधून जोरदार सरी बरसतील, तर एखादा दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्याचे कुलाबा हवामान विभागाच्या अधिकारी सुषमा नायर यांनी सांगितले.

विदर्भात तीन दिवस ‘यलो अलर्ट’

राज्यातील अनेक भागांत पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून, विदर्भात जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपूर, वर्धा, भंडारा, अमरावती, अकोला, यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली आदी भागांत २१ जूनपर्यंत ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला