मुंबई : अखेर मान्सून महाराष्ट्रात सक्रिय झाला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवसांत मान्सून संपूर्ण राज्य व्यापणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
मुंबईच्या माटुंगा, सेनापती बापट मार्ग, वांद्रे आणि वरळी सी-लिंक परिसरात मंगळवारी सकाळपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली. तसेच मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या संपूर्ण कोकण किनारपट्टीच्या भागाला 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील काही तास मुंबई आणि उपनगरांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
त्यासोबतच या पावसामुळे जलाशय आणि धरणांमधील पाण्यासाठ्यात वाढ होऊ शकते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न हळूहळू सुटण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने राज्यातील मान्सूनबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. हवामान विभागाकडून दोन दिवस पालघर जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे, तर ठाणे आणि मुंबई या दोन जिल्ह्यांसाठी पुढचे तीन दिवस पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या काळात ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
सखल भागात काही अंशी वाहतूक संथ
मुंबईत सकाळच्या सत्रात वांद्रे आणि वरळी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात काही अंशी वाहतूक संथ झाली होती. हवामान विभागाने विदर्भातील नागपूर, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. या भागात दमट हवामानासह मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी विजा चमकत असताना सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
‘एल् निनो’च्या प्रभावाने मान्सून रेंगाळला
यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनचा प्रवास काहीसा रेंगाळला होता. साधारणपणे १० जूनच्या आसपास मुंबईत पोहोचणारा मान्सून यंदा तब्बल दोन आठवडे उशिराने सक्रिय झाला आहे. जूनच्या सुरुवातीला दक्षिण कोकणात प्रवेश केल्यानंतर मान्सूनची प्रगती थांबली होती, ज्यामुळे मुंबई-पुण्यासह अनेक मोठ्या शहरांमध्ये पाणी कपातीचे संकट निर्माण झाले होते. मात्र, २१ जूनपासून राज्यात पुन्हा पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले असून हवामान विभागाच्या मते २७ जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळेल. तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यालाही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून सखल भागात पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुण्यामध्ये १९५८ नंतरचा सर्वात कोरडा जून
पुणे: महाराष्ट्रात यंदा मान्सूनने ओढ दिल्याने गेल्या अनेक दशकांतील कोरडेपणाचे रेकॉर्ड मोडीत निघाले. जूनचा अर्धा महिना उलटून गेला तरी पुणे शहर आणि परिसरामध्ये पावसाचा एक थेंबही पडलेला नाही. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, पुण्याच्या शिवाजीनगर वेधशाळेत जूनच्या पहिल्या १५ दिवसांत चक्क ‘शून्य’ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वर्ष १९५८ नंतर म्हणजेच तब्बल ६८ वर्षांनी जूनचा पहिला पंधरवडा पूर्णपणे कोरडा जाण्याची ही पहिलीच वेळ असून, त्यामुळे शहरावरील पाणीसंकट कमालीचे तीव्र झाले आहे.