मान्सूनची गती धीमी, तूर्तास हलक्या सरी; १५ जूनपर्यंत पेरणी नको - सरकारचे आवाहन प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

मान्सूनची गती धीमी, तूर्तास हलक्या सरी; १५ जूनपर्यंत पेरणी नको - सरकारचे आवाहन

गेल्या तीन ते चार महिन्यांपासून प्रचंड उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून मान्सूनच्या पावसाची ते चातकाप्रमाणे वाट पाहात आहेत.

Swapnil S

मुंबई : गेल्या तीन ते चार महिन्यांपासून प्रचंड उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून मान्सूनच्या पावसाची ते चातकाप्रमाणे वाट पाहात आहेत. सध्या मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र, त्यानंतर किमान १५ जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या अंदाजातून दिसत आहे. त्यामुळे, या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे. त्यामुळे १५ जूनपर्यंत पेरणीसाठीचा पाऊस पडणार नसल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

मान्सूनचे आगमन लांबवणीवर पडल्याने शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या या अंदाजानुसारच आपली शेतीची काम करायला हवीत. कारण, १५ जूनपर्यंत पेरणीसाठीचा पाऊस पडणार नसल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. तसेच, शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असेही सांगण्यात आले आहे.

व्यापक क्षेत्रात पेरणीयोग्य पाऊस नाही

सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान १५ जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश, आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल, अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही. दरम्यान, किमान १२ जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च राहण्याची शक्यता आहे. विदर्भ व खानदेशात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक, तर मराठवाड्यात ३५ ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

हलक्या सरींचा अंदाज

राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कोकण प्रदेशातील काही भाग आणि मराठवाड्यात वादळी पावसाची स्थिती आहे. दरम्यान, पुढील तीन ते चार दिवसांत दक्षिण कोकण, तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता कमीच आहे. तर राज्यातील उर्वरित बहुतांश भागांना हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' देण्यात आला असून काही भागात हलक्या सरींचा अंदाज व्यक्त केला आहे.

सर्वदूर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करा...

केवळ वादळी पाऊस आणि तुरळक ठिकाणी होणाऱ्या पावसाच्या अंदाजावर शेतकऱ्यांनी पेरण्या करू नयेत. नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी हवामान अंदाजावर बारीक लक्ष ठेवावे आणि सातत्यपूर्ण तसेच सर्वदूर पाऊस सुरू झाल्यानंतरच पेरणीची कामे हाती घ्यावीत, असेही यात सांगण्यात आले आहे.'सध्याची हवामान स्थिती राज्यात समाधानकारक आणि सर्वदूर पावसाचे संकेत देत किमान १२ जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांत कमाल तापमान चढेच राहण्याची शक्यता आहे', असे या सल्लागार पत्रकात नमूद केले आहे.

नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा

वादळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा या पत्रकातून देण्यात आला आहे. नागरिकांनी झाडांखाली, पत्राच्या शेडखाली किंवा इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर, विजेचे खांब आणि वीज वाहिन्यांजवळ आश्रय घेऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

घरगुती गॅस दरवाढ; विरोधकांचा हल्लाबोल, मोदी सरकारला किंमत मोजावी लागेल - शरद पवार

राजीनामा होत नाही तोवर आंदोलन; धर्मेंद्र प्रधानांच्या गच्छन्तीबाबत ‘कॉकरोच’ ठाम, राजकीय पक्षांशी संबंध नाही - अभिजीत दीपके

पुण्यात रेव्ह पार्टीवर छापा; १०० जण ताब्यात

Mumbai : ८३५ बांधकामांना 'स्टॉप वर्क' नोटीस 

भारत-अफगाणिस्तान एकमेव कसोटी लढत : मानवची पदार्पणात चमक; भारताचा डाव ५६४ धावांवर घोषित, अफगाणिस्तानची ५ बाद ११३ स्थिती