Monsoon Update : राज्यावर चिंतेचे ढग; मान्सून हर्णेपुढे सरकेना 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

Monsoon Update : राज्यावर चिंतेचे ढग; मान्सून हर्णेपुढे सरकेना

प्रशांत महासागरामध्ये अत्यंत प्रभावी ठरत असलेला 'एल निनो' पूर्ण सक्रिय झाला असून, त्याचे गंभीर परिणाम महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत.

Swapnil S

पुणेः प्रशांत महासागरामध्ये अत्यंत प्रभावी ठरत असलेला 'एल निनो' पूर्ण सक्रिय झाला असून, त्याचे गंभीर परिणाम महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत. गेल्या चार दिवसांपासून मान्सूनचे वारे रत्नागिरीतील हर्णे परिसरात सुमारे १५० किलोमीटर अंतरावर स्थिरावले असून, तेथून पुढे सरकण्यास त्यांना पोषक वातावरण मिळत नसल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यावर चिंतेचे सावट पसरले असून, जून महिना अर्धा संपत आला तरी पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

उत्पादन व दर्जावर परिणामाची शक्यता

साधारणपणे ७ ते १० जून दरम्यान होणाऱ्या पेरण्या यंदा १३ जून उलटूनही होऊ शकलेल्या नाहीत. २० जूननंतर पाऊस पडला तरी पिकांच्या उत्पादनावर आणि दर्जावर त्याचा मोठा परिणाम होतो. राज्य सरकारच्या अधिकृत 'सल्ल्यानुसार'च पेरणी करावी, अन्यथा पावसाच्या ओढीमुळे बियाणे वाया जाऊन आर्थिक फटका बसण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. सरकारने या संकटाचा सामना करण्यासाठी विशेष टास्क फोर्स देखील तैनात केला आहे.

जायकवाडीत केवळ २८ टक्के पाणीसाठा

मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणात आता २८ टक्के जिवंत पाणीसाठा उरला आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने सिंचनासाठीचा पाणीपुरवठा आधीच बंद केला असून, आता औद्योगिक क्षेत्राकडे मोर्चा वळवला आहे. जायकवाडीतून विविध एमआयडीसी क्षेत्रांना दररोज ५०.५ दशलक्ष लिटर पाणी दिले जाते, ज्यात आता १० एमएलडी कपातीची तयारी सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरमधील सुमारे ४ हजार कारखान्यांवर यामुळे पाणी कपातीची टांगती तलवार आहे. जर ही कपात लागू झाली, तर औद्योगिक क्षेत्रातील सुमारे अडीच लाख कामगारांच्या रोजगारावर गदा येऊ शकते, असा इशारा सूत्रांनी दिला आहे.

इतिहासाची पुनरावृत्ती आणि दुष्काळाची भीती

'अल निनो' आणि कमी पाऊस यांचा जुना संबंध आहे. ऐतिहासिक आकडेवारीनुसार, २००२ मध्ये ७९%, २००९ मध्ये ८२% आणि २०१५ मध्ये केवळ ८७% पाऊस पडला होता. याउलट १९९७ मध्ये 'अल निनो' असूनही १००% पाऊस झाला होता, मात्र यंदाची परिस्थिती २००२ आणि २००९ सारखी भीषण राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

जूनमध्ये पावसाची २६ टक्क्यांची तूट

'एल निनो 'मुळे हिंदी महासागर आणि अरबी समुद्रातील आर्द्र वारे देशाकडे खेचले जात नाहीत, परिणामी मान्सून कमकुवत झाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात मान्सूनची आगेकूच होण्यासाठी आता २० जून उजाडण्याची शक्यता आहे. तोपर्यंत मुंबईकरांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागणार आहे, तर विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. जूनमध्ये आतापर्यंत पावसाची २६ टक्क्यांची तूट नोंदवण्यात आली असून, ही घट आगामी काळात वाढण्याची भीती आहे.

महिला अधिकाऱ्यांची पहिली तुकडी लष्करात; 'आयएमए'च्या दीक्षांत संचलनाचे राष्ट्रपती यांच्याकडून निरीक्षण

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ भारताचे नवे लष्करप्रमुख

ICC Women's T20 World Cup : पाकिस्तानविरुद्ध भारताची आज परीक्षा; आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकपमध्ये सलामीलाच कठीण पेपर

IAF चे विमान कोसळले; वैमानिकासह ५ ठार, आसामच्या जोरहाट एअरबेसवर लँडिंगवेळी लागली आग, अपघाताच्या चौकशीचे आदेश

आजचे राशिभविष्य, १४ जून २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत