मुंबई : अन्न,औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेने बुधवारी याप्रकरणात मोठी कारवाई केली आहे. मुंबई गुन्हे शाखेने एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक केली आहे. औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणात एमपीएससीचे अप्पर सचिव अभिजीत लेंडवे यांना अटक करण्यात आली आहे. पेपर फुटल्याचा आरोप करणारा गौरव पाटील याचीही भूमिका संशयास्पद असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अद्याप गौरव पाटील याला अटक झालेली नाही.
याशिवाय, एमपीसीचे दोन सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे आणि विश्वेवर नकाते यांनाही अटक करण्यात आली आहे. तसेच, परीक्षार्थी ऋतुजा पाटील हीदेखील संशयाच्या भोवऱ्यात आहे. तिचे वडील अमृत पाटील आणि पेपर फुटीचा सूत्रधार प्रवीण पाटील यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या सगळ्यांच्या पोलीस चौकशीतून आता पेपरफुटीसंदर्भात महत्त्वाची माहिती आणि इतर धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे. या सगळ्यांना बुधवारी कोर्टात हजर केले असता त्यांना २ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तक्रारी आणि संशय
मुलाखती पूर्ण होताच (२२ ते २६ जुलै दरम्यान) काही उमेदवार व लोकप्रतिनिधींनी आयोगाकडे तक्रार दाखल केली. परीक्षेची प्रश्नपत्रिका किंवा त्यातील प्रश्न २२ मार्चच्या आधीच सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर लीक झाले होते, असा गंभीर आरोप या तक्रारींमध्ये करण्यात आला होता. या भरती प्रक्रियेची जाहिरात २९ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर २२ मार्च रोजी महाराष्ट्रातील सहा विभागीय मुख्यालयांवर चाळणी परीक्षा पार पडली. १२ जून रोजी परीक्षेचा निकाल जाहीर होऊन ५०६ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले. १ जुलै ते २२ जुलै दरम्यान झालेल्या मुलाखतींनंतर ४८५ पात्र उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली होती
सहा जणांना अटक
एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचने तीन अधिकाऱ्यांना अटक केली आहे. यामध्ये एमपीएससीचे अवर सचिव अभिजीत लेंडवेस, एमपीएससीतील सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे आणि विश्वेश्वर नकाते यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाला इंटरेस्टिंग बनवणाऱ्या आणखी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये नंदुरबारच्या कौटील्य अकादमीचा संचालक प्रवीण पाटील याचा समावेश आहे.
संपूर्ण भरती प्रक्रियाच रद्द; घेणार फेरपरीक्षा
अन्न आणि औषध प्रशासन विभागातील गट-ब पदासाठीच्या परीक्षेतील गैरप्रकार आणि पेपरफुटीच्या चौकशीत तथ्य आढळल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या पदासाठीची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व उमेदवारासांठी आता फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
‘पेपरफुटी’ची लव्ह स्टोरी
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 'औषध निरीक्षक' परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाला आता एक धक्कादायक वळण मिळाले आहे. विशेष म्हणजे लव्हस्टोरीमुळेच या प्रकरणाचा उलगडा झाल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. या लव्हस्टोरीमधील प्रियकर आणि प्रेयसीच्या वडिलांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यामुळे या कथित लव्हस्टोरीची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कौटील्य अकादमीचा संचालक प्रवीण पाटील हाच पेपरफुटीचा दलाल असल्याचा दावा केला जातोय. त्याने एमपीएससीच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना हताशी धरुन पेपर मिळवलादा अंदाज आहे. याच प्रवीण पाटील याच्याकडून अमृत नामदेव पाटील याने प्रश्न पत्रिका खरेदी केली होती, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे या अमृत पाटील यालाही मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
गौरवची तक्रार, नंतर माघार
अमृत पाटील याने त्याची मुलगी ऋतुजा पाटील हिला ती प्रश्नपत्रिका दिली. हीच प्रश्नपत्रिका तिने प्रियकर लोकेश उर्फ गौरव पाटील यालाही शेअर केली होती. पुढे परीक्षा झाल्यानंतर ऋतुजा पाटील ही पात्र झाली. तिची निवड झाली. पण गौरवची निवड झाली नाही. या दरम्यान मोठा वाद झाला. या वादानंतर गौरव पाटील याने ऋतुजा हिची तक्रार एमपीएससीकडे केली. पण या तक्रारीनंतर लगेच त्याने माघार घेतली. मी मुद्दाम पेपरफुटीचा बनाव केला, असे त्याने एमपीएससीला ई-मेल करुन सांगितले.