संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांना ६,००० रु. दिवाळी भेट; दिवाळी अग्रीम म्हणून १२,५०० रुपये; वेतनवाढीच्या फरकाचा हप्ता आता वेतनासोबत

एसटी महामंडळातील ८५ हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना यंदा दिवाळी भेट म्हणून ६ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. तसेच वेतनवाढीचा फरक दरमहा ६५ कोटी रुपयांच्या स्वरूपात देण्यास मान्यता देण्यात आली असून पात्र कर्मचाऱ्यांना १२ हजार ५०० रुपये दिवाळी अग्रीम म्हणून मिळणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केली.

Swapnil S

मुंबई : एसटी महामंडळात कार्यरत असलेल्या ८५ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना यंदाची दिवाळी भेट म्हणून ६ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच वेतनवाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा ६५ कोटी रुपये देण्याचा आणि पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रीम म्हणून १२ हजार ५०० रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी जाहीर केला.

एसटीच्या सर्व कर्मचारी संघटनांची आणि कृती समितीची बैठक सोमवारी सह्याद्री अतिथीगृहात झाली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. या बैठकीस परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नविन सोना, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, सहसचिव राजेंद्र होळकर, विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

राज्यात अतिवृष्टीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकार शेतकरी बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहे. एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळीदेखील गोड झाली पाहिजे म्हणून शासनाने हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे गरजेचे आहे. एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी खासगी-शासकीय भागीदारीच्या तत्त्वावर (पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप) एसटी महामंडळाच्या जागांचा विकास करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून ६ हजार रुपये देण्यासाठी शासनाने सुमारे ५१ कोटी रुपये अनुदान देण्याचे मान्य केले आहे. तसेच सन २०२०-२४ दरम्यानच्या वेतनवाढीतील फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना दरमहा वेतनासोबत देण्यात येणार असून यासाठी शासनाने ६५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याबरोबरच जे पात्र कर्मचारी सण अग्रीम (फेस्टीव्हल ॲडव्हान्स) घेण्यास इच्छुक आहेत, त्यांनादेखील पूर्वीप्रमाणे १२ हजार ५०० रुपये देण्यात येणार आहेत. त्यासाठी शासनाकडे ५४ कोटी रुपयांची मागणी एसटी महामंडळाने केली आहे, असे सरनाईक यांनी सांगितले.

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन तात्पुरते स्थगित

एसटी कामगारांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसंदर्भात शासन/प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सोमवारपासून महाराष्ट्र एस.टी. कामगार संयुक्त कृती समितीच्यावतीने मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व कृती समितीची बैठक पार पडली. या बैठकीत दिवाळी सानुग्रह अनुदान देण्यासह वाढीव थकबाकीचा हफ्ता देण्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे संयुक्त कृती समितीने धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे कृती समितीने रात्री उशिरा कळवले .

ठाकरे बंधूंची यंदा 'एकत्र' दिवाळी! मनसे दीपोत्सवाचे उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते

वडिलांपेक्षा मुलगा वयाने मोठा कसा? सर्वपक्षीय शिष्टमंडळाची निवडणूक आयोगासमोर प्रश्नांची सरबत्ती, राज ठाकरेंच्या प्रश्नांनी वेधले लक्ष

IPS पूरन कुमार प्रकरणाला नवे वळण; तपास करणाऱ्या IAS अधिकाऱ्याचीही आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये गंभीर आरोप

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण : मुख्य आरोपी वीरेंद्र तावडेसह दोघांना जामीन

जैसलमेरमध्ये भीषण अपघात; खासगी बसला अचानक लागली आग, गाडी जळून खाक, ५७ जण करत होते प्रवास