'लालपरी'चा प्रवास महागणार; सरसकट दोन रुपये स्वच्छता अधिभार, शौचालये मोफत 
महाराष्ट्र

'लालपरी'चा प्रवास महागणार; सरसकट दोन रुपये स्वच्छता अधिभार, शौचालये मोफत

महाराष्ट्रात प्रामुख्याने ग्रामीण भागांतील लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या लालपरीचा प्रवास आता काहीसा महाग होणार आहे.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्रात प्रामुख्याने ग्रामीण भागांतील लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या लालपरीचा प्रवास आता काहीसा महाग होणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी अधिक चांगल्या सुविधा पुरविण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मात्र त्यासाठी तिकीट दरात वाढ होणार असल्याने प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. स्वच्छता आणि सुविधा सुधारणा या उद्देशाने तिकिटावर स्वच्छता अधिभार लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या कायापालटाचा आराखडा जाहीर केला आहे. त्यानुसार, अनेक वर्षांपासून चर्चेत असलेली बसस्थानकांवरील अस्वच्छतेची समस्या दूर करण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार आहेत. मात्र, या सुधारणा अंमलात आणताना प्रवाशांकडूनच निधी उभारण्याचा मार्ग निवडण्यात आला आहे. त्यामुळे तिकीट दरात प्रति प्रवास २ रुपयांचा अतिरिक्त स्वच्छता अधिभार आकारला जाणार आहे.

या नव्या योजनेंतर्गत काही महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत. सर्वात मोठा निर्णय म्हणजे १ जूनपासून एसटी स्थानकांवरील सर्व शौचालये प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध केली जाणार आहेत. त्याशिवाय, प्रत्येक बसस्थानकाची दर चार तासांनी स्वच्छता करणे बंधनकारक करण्यात आले आहे. बस सेवा सुरू होण्यापूर्वी प्रत्येक बस आतून आणि बाहेरून स्वच्छ असल्याची खात्री कंत्राटदारांना करावी लागणार आहे.

प्रमुख बसस्थानकांवर वाचनालय उभारणार

प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी काही उपक्रम राबवले जाणार आहेत. प्रत्येक प्रमुख स्थानकावर वाचनालय उभारण्याची योजना आखण्यात आली आहे, जेणेकरून प्रवाशांचा वेळ उपयोगी जाईल. तसेच, चालक आणि वाहकांसाठी विश्रांतीगृहे आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर दिला जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनाही अधिक चांगल्या परिस्थितीत काम करता येईल.

या सर्व बदलांची अंमलबजावणी १ जूनपासून सुरू होणार आहे. योगायोगाने याच दिवशी एसटी महामंडळाचा वर्धापन दिन असल्याने, या नव्या सुविधांची सुरुवात विशेष ठरणार आहे.

प्रवाशांच्या मागणीनुसारच निर्णय

गेल्या काही वर्षांत एसटी स्थानकांवरील अस्वच्छ आणि अपुऱ्या सुविधांबाबत सातत्याने तक्रारी येत होत्या. 'पैसे घ्या पण दर्जेदार सुविधा द्या', अशी मागणी प्रवाशांनी केल्यामुळे महामंडळाने नवीन मॉडेल लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत, गोळा होणारा निधी थेट स्वच्छतेसाठी वापरला जाईल आणि त्यासाठी व्यावसायिक कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.

IPO चा जोर कायम; जिओ प्लॅटफॉर्म्ससह डझनभर कंपन्या प्राथमिक बाजारात उतरणार

जंतर-मंतरवर आता आंदोलन करता येणार नाही; दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय, तीन नवी ठिकाणे निश्चित

WhatsApp वर आता मेसेज शेड्यूल करता येणार; ठरलेल्या वेळी आपोआप पाठवला जाणार, जाणून घ्या फीचर कसं काम करणार

Mumbai : कोस्टल रोडवर उभारणार अत्याधुनिक बायो टॉयलेट; पालिका करणार ४ कोटी १९ लाख रुपये खर्च

Period Problems : महिन्यातून दोनदा पाळी येतेय? महिलांनो, दुर्लक्ष करू नका; डॉक्टर सांगतात...