मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रुप बुकिंगवर आकारला जाणारा ३० टक्के अधिभार रद्द केल्याने प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या निर्णयामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या ५,१८४ बसांचे ग्रुप बुकिंग पूर्ण झाले असून, उत्सवासाठी आरक्षित करण्यात आलेल्या अतिरिक्त ५,७४१ बसांपैकी जवळपास ९० टक्के बस ग्रुप बुकिंगमधून भरल्या आहेत.
गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर येथून कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन एसटी महामंडळाने १० ते १३ सप्टेंबरदरम्यान विशेष बससेवा चालविण्याचे नियोजन केले आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमधील प्रमुख बसस्थानकांमधून या अतिरिक्त बस सोडण्यात येणार आहेत.
गणेशोत्सवासाठी दरवर्षी मुंबई आणि परिसरातून हजारो कुटुंबे आपल्या गावांकडे रवाना होतात. यासाठी एसटीकडून दरवर्षी अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून दिली जाते. कोकणातील दुर्गम वाड्या-वस्त्यांपर्यंत प्रवाशांना पोहोचविण्याच्या दृष्टीनेही या सेवांचे नियोजन केले जाते. यंदा ग्रुप बुकिंगवरील अधिभार रद्द केल्याने एकत्रित प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी बससेवा अधिक किफायतशीर ठरली आहे.
अतिरिक्त ५,७४१ बसांचे बुकिंग पूर्ण झाले असून, त्यापैकी ५५७ बस वैयक्तिक आरक्षणाद्वारे बुक करण्यात आल्या आहेत. मुंबई विभागातून २,००५ बसांचे बुकिंग झाले असून, त्यापैकी १,७८० बस ग्रुप बुकिंग आणि २२५ बस वैयक्तिक आरक्षणाच्या आहेत. ठाणे विभागातून सर्वाधिक ३,०९१ बसांचे, तर पालघर विभागातून ६४५ बसांचे बुकिंग झाले आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कोकणाकडे होणाऱ्या मोठ्या प्रवासी लोंढ्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
मुंबईतून ६००, अन्य विभागांतून ४ हजार बसेस
प्रवाशांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी एसटीच्या मुंबई विभागातून सुमारे ६०० बस तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय नाशिक, पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर यांसह अन्य विभागांतून ४ हजारांहून अधिक बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्रवासी सेवेसाठी बस रवाना करण्यापूर्वी त्यांची स्थिती तपासण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. सर्व बस सुस्थितीत आणि प्रवासी वाहतुकीसाठी योग्य असल्याची खात्री करूनच त्या सेवेत दाखल केल्या जाणार आहेत.
बसस्थानकांवर २४ तास कर्मचारी
गणेशोत्सवाच्या गर्दीच्या काळात वाहतूक व्यवस्थापनाचे मोठे आव्हान एसटीसमोर असणार आहे. त्यामुळे बसस्थानके आणि थांब्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी २४ तास कार्यरत राहणार आहेत. कोकण महामार्गावरील विविध ठिकाणी वाहन दुरुस्ती पथके तैनात केली जाणार आहेत. बसमध्ये बिघाड झाल्यास किंवा अन्य आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने मदत मिळावी, हा त्यामागील उद्देश आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मार्गावरील आवश्यक ठिकाणी तात्पुरत्या स्वच्छतागृहांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.
गणेशभक्तांच्या गावाकडच्या प्रवासाची तयारी
गणेशोत्सवाच्या काळात मुंबईहून कोकणाकडे मोठ्या संख्येने होणाऱ्या प्रवासाचे नियोजन करण्यासाठी एसटीने आधीपासूनच तयारी सुरू केली आहे. अल्प कालावधीत हजारो प्रवासी एकाच दिशेने प्रवास करणार असल्याने बसची तांत्रिक स्थिती, वेळेवर सुटणाऱ्या फेऱ्या आणि मार्गातील संभाव्य बिघाडांना तातडीने प्रतिसाद देणे हे एसटीसमोरील प्रमुख आव्हान असणार आहे.