मुंबई : महागाईने त्रस्त झालेल्या राज्यातील सर्वसामान्य प्रवाशांना आणखी दणका बसला आहे. एक मोठा आर्थिक फटका बसला आहे. राज्य परिवहन बस अर्थात एसटीने आपल्या भाड्यात मोठी वाढ केली आहे.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) १३.५६ टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावास राज्य परिवहन प्राधिकरणाने शुक्रवारी मान्यता दिली. या निर्णयामुळे साधी बससेवा, विना वातानुकूलित शयन आसनी व विनावातानुकूलित शयनयान बससेवा या प्रवासी वाहतूक सेवांची तिकिटे महागणार आहेत.
वातानुकूलित, निमआराम बससेवांमध्ये वाढ नाही
तसेच शिवनेरी आसनी, शिवनेरी शयनयान, शिवशाही आसनी, शिवशाही शयनयान, जनशिवनेरी, ९ मीटर ई-बस व १२ मीटर ई-बस, ई-शिवाई या वातानुकूलित बससेवा प्रकारांचे तसेच निमआराम बससेवा प्रकाराच्या प्रवास भाड्यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
वातानुकूलित सेवांचे प्रवास भाडेदर ठरविताना ५.५ टक्के प्रवासी कर विचारात घेतलेला आहे. तर सर्व प्रकारच्या टप्पा व दरपत्रकात प्रवासभाड्यात अपघात सहायता निधी १ रुपये व स्वच्छता अधिभार २ रूपये यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. या भाडेवाढीमुळे साधी बस सेवा, विना वातानुकूलित शयन आसनी व विनावातानुकुलीत शयनयान बसने प्रवास करणार्या प्रवाशांना भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली वाढ, एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये करण्यात आलेली वाढ तसेच वाहनांचे सुटे भाग, टायर आणि देखभाल खर्चात झालेली लक्षणीय वाढ यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
वाढत्या खर्चाचा भार सहन करत राज्यातील लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या एसटीच्या दैनंदिन कामकाजावर मोठा आर्थिक ताण निर्माण होत होता. सेवा कोलमडू नये आणि ती अधिक सक्षम व टिकाऊ व्हावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
ही भाडेवाढ करताना प्रवाशांवर कमीत कमी आर्थिक भार पडेल, याची काळजी घेण्यात आली आहे. राज्यातील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित, दर्जेदार आणि अखंडित सेवा देण्यासाठी तसेच एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा आहे. प्रवाशांनी नेहमीप्रमाणे एसटीवर दाखविलेला विश्वास कायम ठेवावा, अशी अपेक्षा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे.
३१ जुलैपर्यंतची हंगामी भाडेवाढ आता रद्द
एसटी महामंडळाकडून उन्हाळी आणि सणासुदीच्या गर्दीच्या हंगामात साध्या बसेससाठी १० टक्के अतिरिक्त प्रवास भाडेवाढ लागू करण्यात आली होती. या हंगामी वाढीची मुदत १५ जुलै रोजी संपली होती. मात्र, महामंडळाने ती मुदत पुढे वाढवून ३१ जुलैपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता सरकारने थेट मुख्य भाड्यातच १३.५६ टक्के वाढ केल्यामुळे, हा ३१ जुलैपर्यंतचा जुना १० टक्के अतिरिक्त भाडेवाढीचा निर्णय तातडीने रद्द करण्यात आला आहे. जरी हंगामी वाढ रद्द झाली असली, तरी मूळ भाड्यात मोठी वाढ झाल्यामुळे प्रवाशांना आता प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. आधीच महागाईचा सामना करणाऱ्या ग्रामीण आणि मध्यमवर्गीय प्रवाशांच्या घरगुती बजेटवर या निर्णयाचा थेट परिणाम होणार आहे.
मध्यरात्रीपासून अंमलात
ही दरवाढ शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच लागू करण्यात येणार आहे. ही वाढ करताना तिकिटाची अंतिम आकारणी ५ रुपयांच्या पटीत करण्यात आली आहे. या भाडेवाढीमुळे यापूर्वी लागू केलेली साध्या बसेसची १० टक्के हंगामी भाडेवाढ रद्द झाली आहे.