मुंबई : पुणे ते मुंबईदरम्यान धावत असलेली एसटीची अत्याधुनिक, आरामदायी आणि सुरक्षित ‘शिवनेरी’ बस आता राज्यभर धावणार आहे. राज्यभर विस्तारासाठी २०० नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त व्होल्वो बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. या बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होताच, मुंबई–पुणेप्रमाणेच इतर महत्त्वाच्या शहरांदरम्यानही शिवनेरी सेवा सुरू होणार आहे.
एसटी महामंडळाने २००२ मध्ये शिवनेरी बस सेवा सुरू केली. या सेवेने उच्च मध्यमवर्गीय प्रवाशांचा विश्वास जिंकला. इतर बससेवेपेक्षा तिकीटदर थोडे अधिक असतानाही सातत्याने मिळणाऱ्या उत्तम प्रतिसादामुळे ही सेवा सुरुवातीपासूनच नफ्यात आहे. त्यामुळे या बसेसचा राज्यभर विस्तार करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. नाशिक-पुणे, नाशिक-छत्रपती संभाजीनगर, नाशिक-जळगाव-धुळे, पुणे-कोल्हापूर, पुणे-सांगली, पुणे-सोलापूर, नागपूर-चंद्रपूर, नागपूर-अमरावती-अकोला अशा प्रमुख शहरांचा समावेश आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागांतील प्रवाशांना आलिशान, सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. नवीन २०० बसेसमध्ये ३० शयनयान बसेसचा समावेश असेल.
सध्या ज्या मार्गांवर विनावातानुकूलित शयनयान बससेवा आहे, त्या ठिकाणी ‘स्लिपर शिवनेरी’ सुरू करून प्रवासी सेवेला अधिक उन्नत रूप दिले जाणार आहे. आरामदायी बेड-कोच सुविधा, सुरक्षितता आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे दीर्घ पल्ल्याच्या प्रवासात प्रवाशांना नव्या अनुभवाची हमी मिळणार आहे.महिला प्रवाशांना तसेच ६५ ते ७५ वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना तिकीटदरात ५० टक्के सवलत, तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना शिवनेरी प्रवास पूर्णपणे विनामूल्य आहे. त्यामुळे नव्या मार्गांवरही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल, असा विश्वास महामंडळाला आहे.
त्याचप्रमाणे सध्या दादर-स्वारगेट, दादर-शिवाजीनगर, बोरिवली-स्वारगेट, बोरीवली-शिवाजीनगर, ठाणे-स्वारगेट आणि ठाणे-शिवाजीनगर या मार्गांवर पर्यावरणपूरक ई-शिवनेरी बस सेवा सुरू असून प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.