मिरज : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विद्यार्थ्यांसह विविध सवलतधारक प्रवाशांसाठी 'रुपे ऑन द गो' ही एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) प्रणालीवर आधारित नवीन कार्ड योजना सुरू केली असून, लवकरच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी या कार्डच्या नोंदणी प्रक्रियेला गती देण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या डिजिटल व्यवहारांना चालना देण्याच्या धोरणानुसार राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना सवलतीच्या प्रवासासाठी स्वतंत्र पासऐवजी आधुनिक, सुरक्षित आणि डिजिटल कार्डचा लाभ मिळणार आहे.
या योजनेची अंमलबजावणी, देखभाल आणि कार्ड वितरणाचे काम इक्विबस टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि एनएसडीएल पेमेंट्स बँक यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. यापूर्वी १६ फेब्रुवारीपासून अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला सवलतधारक प्रवाशांच्या कार्ड नोंदणी व वितरण प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून, पुढील टप्प्यात शालेय तसेच तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या कार्डचा लाभ देण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सवलतीच्या मासिक पाससाठी हे कार्ड आवश्यक राहणार असून, विद्यार्थ्यांनी सरळ अथवा अपार क्रमांक तसेच त्यास जोडलेला शासकीय ओळख क्रमांक उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील. या माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांची पात्रता तपासून कार्ड नोंदणी केली जाईल, अशी माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे.
आगारातील किंवा बसस्थानकावरील वाहतूक नियंत्रक अथवा अधिकृत प्रतिनिधींकडून त्याची पडताळणी करण्यात येईल. या नोंदणीसाठी विद्यार्थी अथवा पालकांचा भ्रमणध्वनी क्रमांक देणेही अनिवार्य असणार आहे.
आवश्यक शुल्क भरल्यानंतर विद्यार्थ्यांना पावती देण्यात येईल. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर साधारणपणे ३० दिवसांच्या आत कार्ड छापून संबंधित आगारात उपलब्ध करून दिले जाईल. त्यानंतर पॉस मशीनद्वारे कार्ड सक्रिय करून ते विद्यार्थ्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
एसटी प्रशासनाचे आवाहन
या डिजिटल कार्डमुळे विद्यार्थ्यांना प्रवास सवलतींचा लाभ अधिक सुलभ पद्धतीने मिळणार असून, भविष्यात विविध सार्वजनिक वाहतूक सेवांमध्येही त्याचा वापर शक्य होणार असल्याचा विश्वास एसटी प्रशासनाने व्यक्त केला आहे. मिरज आगाराने विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक संस्थांनी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक नोंदणी प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन केले आहे.