महाराष्ट्र

भोंदू अशोक खरात प्रकरण : अश्लील व्हिडिओ व्हायरल करणे महागात, गुन्हा दाखल

पोलिस प्रशासनाने नागरिकांना, विशेषतः व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिनना गंभीर इशारा दिला आहे.

Krantee V. Kale

मुंबई : अशोक खरात आणि अनेक पीडितांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबरने विविध सोशल मीडिया लिंक्सवर गुन्हा दाखल केला आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ अन्वये दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्यात व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या किमान चार सोशल मीडिया लिंक्सना लक्ष्य करण्यात आले आहे.

खरातशी संबंधित सुमारे १५ ते १७ अश्लील व्हिडिओ पॉर्न वेबसाइट्ससह फेसबुक, इन्स्टाग्राम आणि टेलिग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फिरत असल्याचे सायबर अधिकाऱ्यांनी सांगितले. हे व्हिडिओ पाहण्यासाठी प्रत्येकी २० ते ५० रुपये आकारले जात असून पैसे दिल्यानंतर ते संबंधितांना पाठवले जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

पोलिसांकडून कडक इशारा

पोलिस प्रशासनाने नागरिकांना, विशेषतः व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिनना गंभीर इशारा दिला आहे. "संबंधित व्हिडिओ कोणाकडेही असल्यास ते तातडीने डिलीट करावेत. हे व्हिडिओ कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारीत करणे हा अजामीनपात्र गुन्हा ठरू शकतो. संबंधित व्यक्तीच नव्हे, तर ग्रुप ॲडमिनवरही कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक केली जाईल," असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, अशोक खरातला मदत करणारी एक तत्कालीन उच्चपदस्थ महिला अधिकारी आता पोलिसांच्या रडारवर आली आहे. नाशिकमध्ये एकेकाळी बड्या पदावर कार्यरत असलेल्या महिला पदाधिकाऱ्याने अशोक खरात याला नियमबाह्य मदत केल्याचा आणि दोघांमध्ये पैशांचा व्यवहार झाल्याचा पोलिसांना संशय आहे. प्रशासकीय कामांमध्ये महिलेने नियमबाह्य मदत केली होती. त्याबदल्यात खरातने तिला पाहिजे ती पोस्टिंग मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. दोघांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाणघेवाण झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे ही महिला अधिकारी आता पोलिसांच्या रडारवर आली आहे.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत रंगत वाढली; शेवटच्या दिवशी ६ उमेदवारांची माघार; काँग्रेसचे आकाश मोरे मैदानात ठाम

Mumbai : ३१ मे पर्यंत १०० टक्के नालेसफाई पूर्ण करा! पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश

कोकणातील कातळशिल्पांवर बनणार आंतरराष्ट्रीय माहितीपट; सरकारकडून १४.५० कोटींच्या निधीला मान्यता

व्याज दर तूर्त स्थिर; RBI चे 'वेट अँड वॉच' धोरण; GDP ६.९ टक्के, महागाई दर ४.६ टक्के राहण्याचा अंदाज

मालिका आणि चित्रपट यांची तुलना नको; मोती सागर यांचे मत