महाराष्ट्र

ऐन उन्हाळ्यात राज्यात मलेरिया - डेंग्यूचा कहर! मुंबईत मलेरियाच्या ९१८ रुग्णांची नोंद; तीन महिन्यांतील एकूण रुग्णसंख्या २,३९२

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांचा राज्यातील अनेक भागांमध्ये ऐन उन्हाळ्यातच प्रकोप झाला आहे. मलेरिया, डेंग्यू व चिकुनगुनिया या किटकजन्य आजारांचा फैलाव झाला असून जानेवारी ते ७ मार्च २०२६ पर्यंत तब्बल २,३९२ रुग्णांची नोंद झाल्याची माहिती पुढे आली आहे.

गिरीश चित्रे

मुंबई : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांचा राज्यातील अनेक भागांमध्ये ऐन उन्हाळ्यातच प्रकोप झाला आहे. मलेरिया, डेंग्यू व चिकुनगुनिया या किटकजन्य आजारांचा फैलाव झाला असून जानेवारी ते ७ मार्च २०२६ पर्यंत तब्बल २,३९२ रुग्णांची नोंद झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यात एकट्या मुंबईत मलेरियाचे ९१८ तर डेंग्यूचे १८२ रुग्ण आढळले आहेत.

मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया, लेप्टो या किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर होतो. मात्र, पावसाळ्यात उद्भवणाऱ्या किटकजन्य आजारांचा फैलाव हा हिवाळ्यात व उन्हाळ्यातही होत असल्याचे राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे.

जानेवारी ते ७ मार्च २०२६ या कालावधीत मलेरिया, डेंग्यू आणि चिकुनगुनिया या आजारांचे हजारो रुग्ण नोंदवले गेले आहेत. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार या कालावधीत राज्यात मलेरियाचे १,३३५ , डेंग्यूचे ८२३ आणि २३४ चिकुनगुनियाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे या तिन्ही आजारांमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची एकही नोंद नसल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

२०२५ वर्षात मलेरियाचे एकूण ३२,६८६ रुग्ण नोंदले गेले असून २८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७ मार्च २०२६ पर्यंत मलेरियाचे २,३३६ रुग्ण नोंदवले गेले आहेत.

डेंग्यूच्या बाबतीत २०२५ मध्ये १४,९६५ रुग्ण आढळले असून ३४ जणांचा मृत्यू झाला. तर ७ मार्च २०२६ पर्यंत २५३ रुग्ण नोंदले गेले असून मृत्यूची नोंद नाही.

चिकनगुनियाचे २०२५ मध्ये १,१८४ रुग्ण नोंदले गेले असून मृत्यूची नोंद नाही. तर ७ मार्च २०२६ पर्यंत २३६ रुग्ण आढळले असून मृत्यूची नोंद झालेली नाही.

मुंबईत १०४ रुग्ण बाहेरून आलेले

मुंबईत किटकजन्य आजारांचा सर्वाधिक प्रभाव दिसून येत आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात मलेरियाच्या ९१८ रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी २२२ रुग्ण पी.एफ. (प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम) प्रकारातील आहेत. तसेच १०४ रुग्ण बाहेरून आलेले (इम्पोर्टेड) असल्याची नोंद आहे. डेंग्यूच्या बाबतीतही मुंबई आघाडीवर असून येथे १८२ रुग्ण नोंदवले गेले आहेत. चिकुनगुनियाचेही ९ रुग्ण मुंबईत आढळले आहेत.

जिल्हानिहाय आकडेवारी

राज्यातील मलेरियाच्या जिल्हानिहाय आकडेवारीनुसार मुंबईत सर्वाधिक ९१८ रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर गडचिरोलीमध्ये १४१, रायगडमध्ये ३९, अमरावतीमध्ये १०, रत्नागिरीमध्ये ८ तर चंद्रपूरमध्ये ७ मलेरियाचे रुग्ण नोंदवण्यात आले आहेत.

शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी 'लवकर या, लवकर जा' सवलत; मुंबई महानगर क्षेत्रासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची घोषणा

वर्षअखेर बुडबुडे फुटणारा अर्थसंकल्प!

आजचे राशिभविष्य, ११ मार्च २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Chinese Dosa Recipe : डोसा तर नेहमीच खातो, पण 'चायनीज डोसा' कधी ट्राय केलाय का? घरच्या घरी बनवा हटके रेसिपी

Iran-US-Israel युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निर्णय; नैसर्गिक वायू पुरवठ्यासाठी 'आवश्यक वस्तू कायदा' लागू, जाणून घ्या अर्थ