मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंक बोगद्यात शुक्रवारी (दि. ७) मध्यरात्री सुमारे १.३० वाजता भीषण अपघात झाला. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव फॉर्च्युनरने भाजीपाला वाहतूक करणाऱ्या टेम्पोला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले.
भरधाव फॉर्च्युनरची टेम्पोला धडक
महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री सुमारे १.३० वाजता फॉर्च्युनर (MH 14 MG 0007) पुण्याहून मुंबईकडे जात होती. जवळपास ९ किलोमीटर लांबीच्या मिसिंग लिंक बोगद्यात या वाहनाने भाजीपाला वाहतूक करणाऱ्या टेम्पोला (MH 01 CR 7075) मागून जोरदार धडक दिली.
माध्यमांच्या वृत्तानुसार, धडकेची तीव्रता इतकी होती की, पुण्यातील उद्योजक तथा राजकीय क्षेत्रातील तुषार भुमकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातावेळी ते चालकाच्या शेजारील सीटवर बसले होते. वाहनातील एका प्रवाशाला गंभीर दुखापत झाली असून, अन्य तीन जण किरकोळ जखमी झाले. प्राथमिक माहितीनुसार, फॉर्च्युनरमधील पाचही जण वाकडमधील भूमकर चौक परिसरातील रहिवासी आहेत.
वेगावरील नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज
बोगद्यात काही वाहने थांबलेली असताना भरधाव फॉर्च्युनरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती मालवाहू टेम्पोवर आदळली असावी, असा प्राथमिक अंदाज महामार्ग पोलिसांनी व्यक्त केला आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
दोन तास वाहतूक विस्कळीत
अपघातानंतर मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक जवळपास दोन तास बंद ठेवण्यात आली. या काळात वाहने जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वळवण्यात आली. अपघातामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दोन्ही अपघातग्रस्त वाहने महामार्गावरून हटवल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
बचाव पथकांची तातडीने धाव
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस, आयआरबी गस्ती पथक, देवदूत आपत्कालीन प्रतिसाद पथक आणि इतर बचाव यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना वाहनातून बाहेर काढून तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
वाकड परिसरात शोककळा
तुषार भुमकर यांच्या निधनाची बातमी समजताच वाकड परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. सामाजिक, व्यावसायिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यंदा फेब्रुवारीमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांच्या पत्नीने प्रभाग क्रमांक २५ मधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, अशी माहिती समोर आली आहे.
महामार्ग पोलिसांकडून तपास सुरू
महामार्ग पोलिसांनी या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, चालकाचा वेग, बोगद्यातील परिस्थिती आणि इतर तांत्रिक बाबींचा तपास सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण काय, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.