पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार याच्याशी संबंधित मुंढवा भूखंड घोटाळ्यात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि विजय कुंभार यांनी पार्थ पवार व शीतल तेजवानी यांच्यात झालेल्या ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’ (मुखत्यारपत्र) व्यवहाराशी संबंधित महत्त्वाचे दस्तावेज समोर आणले. या दस्तऐवजांवर दोन्ही पक्षांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
अंजली दमानिया व विजय कुंभार यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत पार्थ पवार आणि शीतल तेजवानी यांच्या सह्या असलेले ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’चे दस्तावेज समोर आणले. धक्कादायक बाब म्हणजे, संबंधित कागदपत्रे स्वतः दिग्विजय पाटील आणि शितल तेजवानी यांचे वकील असलेल्या वकील तृप्ता ठाकूर यांनीच बाहेर काढली आहेत.
या प्रकरणात पार्थ पवार यांचे नाव वारंवार समोर येत असतानाही त्यांच्यावर कोणतीही थेट कारवाई होत नसल्याची भावना संबंधित वकिलांमध्ये असल्याचे बोलले जात आहे. दिग्विजय पाटील आणि शितल तेजवानी यांनाच सातत्याने चौकशी व त्रासाला सामोरे जावे लागत असून, पार्थ पवार मात्र गोत्यात येत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. याच भावनेतून वकील तृप्ता ठाकूर यांनी पार्थ पवारांविरोधातील कागदपत्रे समोर आणल्याचे अंजली दमानिया यांनी सांगितले आहे.
मुंढवा भूखंड घोटाळ्यात पार्थ पवारांवरही गुन्हा दाखल व्हावा. पण राजकीय दबावामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात नाही. या ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’वर पार्थ पवारांची प्रत्येक पानावर स्वाक्षरी आहे. त्यांचा फोटोही त्यावर आहे. यात उभयंतांत झालेले व्हॉट्सॲॅप चॅटही आहे. संतोष हिंगणे व तृप्ता ठाकूर यांच्याही चॅटचा यात समावेश आहे, असा आरोपही अंजली दमानिया यांनी केला.
मुख्यमंत्री, महसूल मंत्र्याचे पवारांना अभय
अंजली दमानिया म्हणाल्या, प्रस्तुत प्रकरणात पार्थ पवारांच्या स्वाक्षरीचे पत्र आहे. पण पार्थ पवारांनी तेव्हा हे पत्र आपल्या स्वाक्षरीचे नसल्याचा दावा केला होता. २५ मे २०२१ रोजी हा व्यवहार करण्यात आला. हे सर्व दस्तावेज सरकारदरबारी जमा आहेत. मागील ५-६ वर्षांपासून हा घोटाळा सुरू आहे. अजित पवारांना हे सर्व काही माहिती होते. मुख्यमंत्री व महसूल मंत्री या प्रकरणात त्यांना अभय देत आहेत.