अरविंद गुरव/पेण
२०१८ साली केंद्रासह राज्य शासनाने कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या आणि वस्तूंच्या वापरावर बंदी आणली आहे. देशासह राज्यात प्लास्टिक मुक्त अभियान राबविले जात आहे. मात्र रायगड जिल्ह्यासह पेण तालुक्यात प्लास्टिकचा वापर सर्रास होत आहे, त्यामुळे येथील पर्यावरणाचा श्वास कोडत आहे. तसेच मोकाट आणि पाळीव जनावरांचे भक्ष या प्लास्टिकच्या पिशव्या बनत असल्याने अनेक जनावरांचा मृत्यू देखील होत आहेत. पेणमध्ये होत असलेल्या प्लास्टिक वापराबाबत दैनिक ‘नवशक्ति’मध्ये शनिवारी बातमी प्रसिद्ध झाली होती. या बातमीची पेण नगरपालिकेकडून दखल घेऊन त्वरीत कारवाईला सुरवात झाली आहे. त्यामुळे प्लास्टिक पिशव्यांचा वापर आणि साठा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
शहराची वाढती लोकसंख्या पाहता शहरातून दररोज अंदाजे २० टनापेक्षा अधिक घरगुती कचरा संकलित केला जातो. या कचऱ्यात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक आढळते, तसेच बाजारपेठेतील दुकानदार, किरकोळ विक्रेत्यांकडून पत्रास मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची सर्रास विक्री व वापर केला जात आहे. शहरात असंख्य हॉटेल्स, चायनीज, वडापाव विक्रेते, तसेच कापड दुकानदार, भाजीवाले, व्यापारी व इतर व्यावसायिक, हातगाडीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला आहे. त्यामुळे बाजारपेठ, भाजी मंडईची मागील बाजू, उत्कर्ष नगर दातार आळी, बोरगांव रोड, झिराळ आळी, कुंभार तलाव
परिसर, भोगावती नदी परिसर, नगरपालिका स्टेडिअमच्या मागील बाजू आदी ठिकाणी प्लास्टिक कचरा दिवसेंदिवस साचत आहे. पेण नगरपालिकेच्या माध्यमातून प्लास्टिक पिशव्यांविरोधात पुन्हा मोहीम सुरू करण्यात आली आहे.
ही मोहीम अशीच सुरू राहील
पेण नगरपालिकेकडून २० ते २५ दुकानांची तपासणी करण्यात आली. यावेळी ७ ते ८ दुकानांमध्ये सुमारे १०० किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा सापडला. या कारवाईत सुमारे १६ हजार ३०० रुपयांचा दंड नगरपालिकेकडून वसूल करण्यात आला असून मिळालेला साठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती पेण नगरपालिकेचे आरोग्य निरक्षक दया गावंड यांनी "नवशक्ति"ला दिली. तसेच प्लास्टिक पिशव्यां विरोधातील ही मोहीम अशीच सुरू राहील, असे अतिक्रमण आणि वसूली विभाग प्रमुख महेश वडके यांनी सांगितले. या प्लास्टिकविरोधी मोहिमेत कमलाकर आवासकर, अक्षय म्हात्रे आणि बाळा मोरे आदी कर्मचारी सहभागी झाले होते.