मुंबई : महानगरपालिका निवडणूकांच्या प्रचाराची समाप्ती झाल्यानंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने कुठलाही नवीन आदेश निर्गमित केलेला नाही. त्यासंदर्भातील आदेश जुनाच असून तो राज्य निवडणूक आयोगाने १४ फेब्रुवारी २०१२ मध्येच निर्गमित केलेला आहे, असे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाकडून देण्यात आले.
१४ फेब्रुवारी २०१२ रोजीच्या आदेशानुसार, जाहीर प्रचार समाप्तीनंतर उमेदवार हे मतदान केंद्राच्या १०० मीटर बाहेर मतदारांना भेटून आणि घरोघरी जाऊन प्रचार करु शकतील; परंतु माईकचा वापर करता येणार नाही आणि उमेदवारांना समुहाने फिरता येणार नाही. जाहीर प्रचार ४८ तास आधी बंद होत असतो. जाहीर सभा, रॅली आणि मिरवणुका यांचा या जाहीर प्रचारात समावेश आहे. मात्र, वैयक्तिक प्रचाराला बंदी नसते. उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करू शकतात. लोकसभा आणि विधानसभेला देखील हेच नियम लागू होते, असे सांगताना वाघमारे यांनी आयोगाच्याच १४ फेब्रुवारी २०१२ सालच्या एका आदेशाचा संदर्भ दिला. त्यात जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर उमेदवार हे मतदान केंद्राच्या 100 मीटर बाहेर मतदारांना भेटून तसेच घरोघरी जाऊन प्रचार करू शकतील. मात्र त्यांना ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही, अशी माहिती वाघमारे यांनी दिली.