मुरूडच्या मच्छिमारांसाठी 'रापण' उदरनिर्वाहाचे वरदान; पावसाळ्यात पारंपरिक मासेमारीला प्राधान्य; फीलसा माशाला बाजारात चांगला दर 
महाराष्ट्र

मुरूडच्या मच्छिमारांसाठी 'रापण' उदरनिर्वाहाचे वरदान; पावसाळ्यात पारंपरिक मासेमारीला प्राधान्य; फीलसा माशाला बाजारात चांगला दर

राज्य शासनाने सागरी जैवसंपत्तीचे संवर्धन आणि माशांच्या प्रजननाला चालना मिळावी, यासाठी दरवर्षी १ मे ते ३१ जुलै या कालावधीत यांत्रिक सागरी मासेमारीवर बंदी घातली आहे. या दोन महिन्यांच्या बंदीमुळे खोल समुद्रात मासेमारी बंद असली तरी मुरूडमधील कोळी बांधवांनी उदरनिर्वाहासाठी पारंपरिक ‘रापण’ मासेमारीचा आधार घेतला आहे.

Swapnil S

संजय करडे/ मुरूड-जंजिरा

राज्य शासनाने सागरी जैवसंपत्तीचे संवर्धन आणि माशांच्या प्रजननाला चालना मिळावी, यासाठी दरवर्षी १ मे ते ३१ जुलै या कालावधीत यांत्रिक सागरी मासेमारीवर बंदी घातली आहे. या दोन महिन्यांच्या बंदीमुळे खोल समुद्रात मासेमारी बंद असली तरी मुरूडमधील कोळी बांधवांनी उदरनिर्वाहासाठी पारंपरिक ‘रापण’ मासेमारीचा आधार घेतला आहे.

सध्या मुरूडच्या विविध समुद्रकिनाऱ्यांवर मच्छिमार बोटी न नेता किनाऱ्यालगत रापणच्या सहाय्याने मासेमारी करताना दिसत आहेत. या पारंपरिक पद्धतीमुळे अनेक कुटुंबांना रोजगार मिळत असून त्यांच्या उदरनिर्वाहाला हातभार लागत आहे. मात्र, पावसाळ्यातील खराब हवामान, समुद्रातील बदलती परिस्थिती, मासळीचे घटलेले प्रमाण तसेच एलईडी आणि पर्सनेट बोटींकडून होणाऱ्या कथित अनधिकृत मासेमारीमुळे स्थानिक मच्छिमारांच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याची भावना कोळी बांधवांनी व्यक्त केली. तरीही शासनाच्या नियमांचे पालन करत पारंपरिक रापणच्या माध्यमातून मासेमारी सुरू ठेवली आहे.

कोळी बांधवांसाठी उदरनिर्वाहाची प्रमुख आशा

पहाटे चार ते पाच वाजता सुरू होणारे रापणचे काम दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू असते. सध्या रापणमधून फीलसा ही मासळी मोठ्या प्रमाणात मिळत असून बाजारात तिला चांगला दर मिळत आहे. दोन ते तीन किलो वजनाचा फीलसा मासा सुमारे ८०० रुपयांपर्यंत विकला जातो. एका रापणच्या जाळ्यासाठी साधारण १५ ते २० तरुण मच्छिमारांची आवश्यकता असते. दिवसभराच्या मेहनतीनंतर मिळालेली मासळी विकून प्रत्येक जण आपापला वाटा घेऊन घरी परततो.

सामूहिक पद्धतीची मासेमारी

रापण ही अत्यंत कष्टसाध्य आणि सामूहिक पद्धतीची मासेमारी आहे. या पद्धतीत मोठे जाळे समुद्रात टाकले जाते. जाळ्याच्या दोन्ही बाजूंना सुमारे ५० ते ६० वाव लांबीचे जाड दोरखंड, पाटे आणि मजबूत दांडके जोडलेले असतात. सुमारे १५ फूट उंचीचे हे जाळे समुद्राच्या मोठ्या भागात पसरविले जाते. त्यानंतर किनाऱ्यावरून अनेकजण एकत्रितपणे ते ओढतात. हे काम अत्यंत मेहनतीचे असून त्यासाठी मजबूत शरीरयष्टी आणि संघभावना आवश्यक असते. जाळे किनाऱ्यावर आल्यानंतर त्यात मासे मिळाले नाहीत, तर पुन्हा संपूर्ण प्रक्रिया करावी लागते. मासळी मिळाल्यानंतर ती खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना विकली जाते, तर उर्वरित मासळीची सहभागी मच्छिमारांमध्ये वाटणी केली जाते.

प्रत्येक वॉर्डात नियुक्त होणार 'पेशंट नेव्हिगेटर'; कर्करोग रुग्णांसाठी BMC ची नवी यंत्रणा; २४ आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण

Mumbai : केबल-स्टेड आधारित मढ-वर्सोवा पुलाला मिळणार गती; कांदळवन पुनर्स्थापनेसाठी १२.५० कोटी पालिका मोजणार

मोटर लोडरांचे कामबंद आंदोलन; सेवाधारित कंत्राट पद्धतीविरोधात कर्मचारी आक्रमक; भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग, पवईत कचऱ्याचे ढीग

Mumbai : मुख्यालयासमोरच नवे ३५० आसनी सभागृह; चार मजली इमारतीत पार्किंगसह आधुनिक सुविधा

TDR वापरला म्हणून जमिनीचे हस्तांतरण नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल