मुरूड-जंजिरा : मुरूड तालुक्यातील तेलवडे ग्रामपंचायत हद्दीतील टक्का आदिवासी वाडीलगतच्या जंगल परिसरात शिकारीच्या उद्देशाने आलेल्या दोघांना मुरूड पोलिसांनी शस्त्रांसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन रायफल, १०४ जिवंत काडतुसे आणि वन्यजीवांची शिकार करण्यासाठी वापरली जाणारी हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.
या परिसरात काही व्यक्ती शिकारीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. यावेळी पांढऱ्या रंगाची गाडी संशयास्पदरीत्या दिसल्याने तिची तपासणी करण्यात आली.
त्यात एक सिंगल बोअर आणि एक डबल बोअर रायफल, जिवंत काडतुसे तसेच शिकारीची हत्यारे आढळली. या प्रकरणी चेंबूर, मुंबई येथील क्रेसेन्ट लुकस डिमेलो (५९) आणि ग्राफिक क्रेसेन्ट डिमेलो (२३) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.